माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते शिवराज पाटील यांनी त्यांच्या जिहादसंदर्भातील विधानावरुन वाद निर्माण झाल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्याला जिहाद आणि श्रीकृष्ण व अर्जून यांच्या संवादासंदर्भात केलेल्या विधानातून नेमकं काय म्हणायचं होतं याबद्दल पाटील यांनी खुलासा केला आहे. “कृष्णाने अर्जूनाला दिलेल्या उपदेशांना तुम्ही जिहाद म्हणाल का? नाही ना. हेच मी सांगत होतो,” असं शिवराज पाटील यांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिल्लीमधील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामधील व्हिडीओ ट्वीट केल्याने शिवराज पाटील यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एएनआय या वृत्तसंस्थेशी निर्माण झालेल्या गोंधळावरुन बोलताना पाटील यांनी इस्लाममधील पवित्र धर्मग्रंथ असलेल्या कुराणची प्रत हातात पकडून पत्रकाराला आपल्याला नेमकं काय म्हणायचं होतं हे सांगितलं. “हे कुराण शरीफ आहे. तुम्ही आधी ऐकून घ्या. यात सांगितलं आहे की देव एकच असून त्याला कोणतंही रुप नाही. ख्रिश्चन, ज्यू लोकांचंही असेच म्हणणं आहे की देव आहे मात्र त्याला मूर्त स्वरुप देता येत नाही. गीतेतही देवाला कोणता रंग आणि रुप नसल्याचं म्हटलं आहे,” असं पाटील यांनी म्हटलं.

पाटील यांनी केलेल्या विधानानंतर भारतीय जनता पार्टीने निषेध व्यक्त केला आहे. पाटील यांनी कृष्ण आणि अर्जूनाच्या संभाषणाचा संबंध जिहादशी जोडल्याचा आरोप करत काँग्रेस हिंदूंबद्दलचा द्वेष यामधून दाखवत असल्याचं भाजपाचं म्हणणं आहे. आधी त्यांनी हिंदू दहशतवाद ही संज्ञा शोधली, नंतर त्यांनी राम मंदिराला विरोध केला त्यानंतर त्यांनी हिंदूत्वाची तुलना आयसीससारख्या दहशतवादी संघटनेशी केल्याचा संदर्भ देत भाजपाने पाटील यांच्या विधनावरुन काँग्रेसला लक्ष्य केलं.

नेमकं घडलं काय?

जिहाद ही संकल्पना केवळ इस्लाममध्ये नसून भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मातही आहे, असे विधान शिवराज पाटील यांनी गुरुवारी केले. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या चरित्राचे प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ‘‘इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेबाबत अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे. केवळ कुराणच नव्हे, तर महाभारतातील गीतेमध्ये आणि ख्रिश्चन धर्मातही हेच सांगितले आहे,’’ असं पाटील यांनी म्हटलं होतं.

या विधानावरून भाजपाने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. ‘काँग्रेसने भगवा दहशवाद संकल्पनेला जन्म दिला, राममंदिराला विरोध केला, प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वावर संशय घेतला, हिंदूत्वाची तुलना आयसिसशी केली’ असे ट्विट भाजपा नेते शहेजाद पुनावाला यांनी केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I asked will you call krishna lesson to arjun jihad shivraj patil clarifies scsg
First published on: 21-10-2022 at 12:37 IST