कॅलिफोर्नियात शिक्षणासाठी गेलेल्या २२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. साकेत श्रीनिवासय्या असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. सहा दिवसांपूर्वी तो बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. आता त्याचा मृतदेह आढळून आला. साकेत श्रीनिवासय्या हा विद्यार्थी मूळचा कर्नाटकचा आहे. त्याच्या मित्राने आता त्याच्या आठवणी सांगितल्या आहेत.
साकेत कुकीज आणि वेफर्स खाऊन राहात होता-बनीत सिंग
साकेत श्रीनिवासय्या हा तसा मितभाषी पण अभ्यासू मुलगा होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या रुममेटने आता त्याच्या आठवणी सांगितल्या आहेत. बनीत सिंग हा साकेतचा मित्र होता. त्याने एक पोस्ट लिहिली आहे. त्यात तो म्हणतो, साकेत ९ फेब्रुवारीला बेपत्ता झाला होता. त्याआधी तो वेफर्स आणि कुकीज खाऊनच राहात होता. परदेशात शिकायला आलेल्या भारतीय विद्यार्थ्याचं आयुष्य काहीसं कठीण असतं. मागच्या दोन आठवड्यांपासून त्याने जेवण कमी केलं होतं. त्याला फारशी झोपही यायची नाही. तो वेफर्स आणि कुकीज खाऊनच राहात होता. २१ जानेवारीला साकेत अंझा लेक या ठिकाणी गेला होता. त्याला वाटलं होतं की मी पण त्याच्याबरोबर येईन. पण मी जाण्याचा कंटाळा केला. मला थोडीशी जरी कल्पना असती की असं काहीतरी होईल तर मी त्याच्यासोबत गेलो असतो कदाचित त्याला समजावू शकलो असतो. एकदा साकेत लाल रंगाच्या बार्थरोबमध्ये वर्गात आला. त्यावेळी तो म्हणाला मला आता या सगळ्याची पर्वा नाही. मला थंडी वाजते आहे त्यामुळे मी बार्थरोब गुंडाळून आलोय. कोण माझ्याबाबत काय विचार करतंय मला त्याने फरक पडत नाही अशी आठवणही बनीत सिंगने सांगितली.
मी साकेतला विसरु शकणार नाही-बनीत सिंग
बनीत पुढे म्हणाला, साकेत हसतमुख असायचा, विनोदही करायचा. तो अशा काही गोष्टी करायचा ज्या मूर्खपणा वाटतील. मला आज त्याचा अर्थ कळतोय. पण मला हे नक्की माहीत आहे की आयुष्य जगलं पाहिजे. मृत्यू हा आयुष्याचा विरुद्धार्थी शब्द नाही ते एक सत्य आहे. साकेतने स्वतःची काळजी करणं सोडून दिलं होतं. मी साकेतला विसरु शकणार नाही कारण त्याचा स्वभाव खूप चांगला होता असंही बनीतने माध्यमांना सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
९ फेब्रुवारीला साकेतने वडिलांना केला होता फोन
कर्नाटक सरकारने साकेत श्रीनिवासय्या बेपत्ता झाल्याचं वृत्त येताच केंद्राने या प्रकरणी लक्ष घालावं अशी मागणी पत्र लिहून केली होती. साकेतच्या वडिलांनी ही मागणी केली होती की त्याच्यासोबत राहणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी केली जावी. त्यांच्याकडे साकेतबाबत विचारणा करण्यात यावी. या मागणीचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला होता. दरम्यान आता साकेतचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साकेत आणि त्याच्या वडिलांचा फोन ९ फेब्रुवारीला झाला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची बातमीच आली. त्याच्या मित्रांकडे विचारणा केली असता तो बेपत्ता झाला आहे असं त्यांनी सांगितलं. मी अमेरिकेला जाण्याचा विचार करतो आहे असंही त्याचे वडील म्हणाले होते. या सगळ्यानंतर आता सहा दिवसांनी साकेतचा मृतदेह आढळून आला आहे.
