क्राँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी आपल्या पक्षाला एकप्रकारे घरचा आहेर दिलाय. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये ३०० जागा जिंकेल असं आपल्याला वाटत नसल्याचं रोकठोक मत आझाद यांनी व्यक्त केलंय.

कलम ३७० संदर्भात फारसं न बोलण्याची आपली भूमिका स्पष्ट करताना आझाद यांनी, हे प्रकरण जेथे दाखल आहे ते सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच हे कलम पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतं असं मत व्यक्त केलंय. कृष्णा खोऱ्यातील पुंछ जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना आझाद यांनी कलम ३७० भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने रद्द केलं असल्याने ते कलम पुन्हा त्यांच्याकडून लागू केलं जाणार नाही, असंही म्हटलंय.

“आपल्याकडे (आपलं सरकार स्थानप करण्यासाठी) ३०० खासदार कधी असणार? त्यामुळे मी तुम्हाला (कलम ३७० पुन्हा लागू करण्याचं) आश्वास देऊ शकत नाही कारण काहीही झालं तरी त्यासाठी २०२४ मध्ये ३०० खासदार निवडून येणं गरजेचं आहे. देव करो आणि आपले ३०० (खासदार) निवडून येवोत. पण सध्याची परिस्थिती पाहता हे होईल असं वाटतं नाही. त्यामुळेच मी तुम्हाला खोटी आश्वासनं देत नाहीय आणि कलम ३७० बोलणं टाळतोय,” असं आझाद यांनी स्पष्टपणे सांगितलं.

सध्या आझाद हे पुंछ आणि राजौरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कलम ३७० संदर्भात बोलणं हे अयोग्य ठरेल असंही काही दिवसांपूर्वी आझाद म्हणाले होते. पूर्ण राज्याचा दर्जा देणे आणि लवकर विधानसभा निवडणूक घेणे या आपल्या दोन प्रमुख मागण्या आहेत, असं आझाद यांनी म्हटलं होतं.

आझाद यांच्या या वक्तव्यावरुन नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी टीका केलीय. सर्वोच्च न्यायालयाने हे (कलम ३७० चं) प्रकरण हाती घेण्याआधीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पराभव स्वीकारलाय, अशी टीका त्यांनी केली होती.

मागील तीन वर्षांपासून आपणच संसदेमध्ये कलम ३७० संदर्भातील निर्णयाला विरोध करत असल्याचं आझाद यांनी स्पष्ट केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी सरकारला बदल करण्याचा अधिकार असला तरी तो बदल जम्मू-काश्मीर विधानसभेच्या माध्यमातून व्हायला हवा होता संसदेमधून नाही, असंही आझाद यांनी म्हटलंय.