scorecardresearch

होय, मी दहशतवादी आहे; केरळमधल्या बेपत्ता युवकाचा संदेश

माझ्या समुदायावर हल्ले केले जात असताना मी काय करत होतो, असे अल्लाह मला विचारेल.

isis, syria
प्रतिकात्मक छायाचित्र

केरळातील कसरगोड जिल्ह्य़ातील बेपत्ता झालेल्या १५ तरुणांपैकी एका युवकाने आपल्या कुटुंबाला संदेश पाठवला आहे. लोक मला दहशतवादी म्हणून बोलतील. अल्लाहच्या मार्गावर लढणे दहशतवाद असेल तर होय, मी दहशतवादी आहे, असा संदेश केरळमधून बेपत्ता असलेल्या युवकाने त्याच्या कुटुंबाला पाठवला आहे. आयसिसच्या वतीने लढण्याकरिता केरळचे १५ युवक गेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून ते बेपत्ता आहेत. ते आयसिसला गेल्याचा संशय असून ही अतिशय गंभीर बाब आहे, असे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार संदेश पाठवणा-या या तरुणाची ओळख मोहम्मद मारवान (वय २३) अशी आहे. हा संदेश त्याच्याकडून गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाठविण्यात आला होता. मारवान याने सध्या इसिसच्या नियंत्रणाखाली असलेल्या सीरिया-इराकच्या प्रदेशामध्ये गेला असल्याचा दावा केला आहे. पण त्याच्या या दाव्यास सुरक्षा दलांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. इसिस बरोबरचे काम संपवून मी परत येईन. त्यानंतर मला काश्मीर, गुजरात आणि मुझफ्फरनगर मधील पिडित मुस्लिमांना मदत करायची आहे. काश्‍मीर, गुजरात आणि मुझफ्फरनगर येथे शिरकाण करण्यात आलेल्या मुस्लिमांचा सूड घेतल्यानंतर मी परत येईन. मुस्लिम समाजावर अन्याय सुरु असताना मी शांतपणे घरी कसा काय बसू शकतो ? माझ्या समुदायावर हल्ले केले जात असताना मी काय करत होतो, असे अल्लाह मला विचारेल. मुस्लिमांच्या संरक्षणासाठी लढणे हे माझे धार्मिक कर्तव्य आहे असे मोहम्मदने आपल्या संदेशात म्हटले आहे. इस्लामासाठी लढताना मृत्यू झाला तर, शहीद म्हणून माझी गणना होईल असेही मोहम्मदने आपल्या संदेशात म्हटले आहे.
कसरगोडच्या बेपत्ता लोकांमध्ये चार महिला व तीन मुलांचा समावेश आहे. तसेच पलक्कडमधील दोन महिला बेपत्ता आहेत. ते लोक विविध कारणांसाठी घर सोडून गेले आहेत. प्रसारमाध्यमातील बातम्यानुसार ते आयसिसच्या छावण्यात असून सीरिया व अफगाणिस्तानात गेले आहेत. आयसिसमध्ये केरळचे तरुण मोठय़ा प्रमाणावर गेल्याच्या वृत्ताने केरळात भीतीचे वातावरण आहे असे चेन्नीथाला यांनी सांगितले होते, पण तशी कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही त्यामुळे सरकारने यावर स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणालेले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-07-2016 at 14:12 IST
ताज्या बातम्या