मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असल्याचा खुलासा द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तातून करण्यात आला, ज्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी २ ऑक्टोबरच्या दिवशी म्हणजेच येत्या शुक्रवारी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला आता सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही पाठिंबा दिला आहे.

सोनम वांगचुक यांनी काय म्हटलं आहे?

देशात पारदर्शक कारभाराच्या दिशेने जे पाऊल टाकलं जाईल त्याला आम्ही पाठिंबाच देणार आहोत. त्यामुळेच मी अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी होतं आहे त्याला पाठिंबा दिला आहे. निवडणूक प्रक्रिया ही सर्वात मोठी गरज आहे देशाची, जर ही प्रक्रियाच बिघडणार असेल तर मग लोकशाहीमध्ये उरतंच काय? शिक्षणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरला होता तेव्हा ते सगळे म्हणजेच सीजेपीचे कार्यकर्ते नवे होते. आता ते नव्या आंदोलनासाठी सज्ज आहेत. देशासाठी जे आंदोलन केलं जाईल त्या त्या आंदोलनात मी त्यांच्या पाठिशी असेन असं सोनम वांगचुक यांनी पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. तसंच ते पुढे म्हणाले, जे पक्ष जे नेते देशात उत्तर मागत आहेत त्या सगळ्यांच्या पाठिशी मी आहे. तसंच ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा झालाच पाहिजे. आमची तर अशीच मागणी आहे की जे जाहीरनामे काढले जातात त्याबाबतही सरकार उत्तरदायी आहे. सीजेपीच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मी त्या आंदोलनात सहभागी होऊ शकणार नसलो तरीही माझा पाठिंबा आहे असं सोनम वांगचुक म्हणाले आहेत.

अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाबाबत संजय राऊत काय म्हणाले?

अभिजीत दिपके यांनी २ ऑक्टोबरला आंदोलन आयोजित केलं आहे. या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. त्यांना पहिल्या दिवसापासून आम्ही पाठिंबा दिला आहे यापुढेही असेल. कॉक्रोच जनता पार्टी हा राजकीय पक्ष नाही. पण राजकीय पक्षांचं जे नुकसान झालं आहे त्यामुळे शिवसेनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं.

२ ऑक्टोबरला कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २ ऑक्टोबरला सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन करणार आहे. जर राजीनामा झाला नाही तर पुढचं आंदोलन जंतर-मंतर या ठिकाणी होईल असंही अभिजीत दिपकेंनी जाहीर केलं आहे. दरम्यान ४ ऑक्टोबर रोजी ठाकरे बंधूही मुंबईत मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात सर्व विरोधी पक्षांनी सहभागी व्हावं असं आवहान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलं आहे.