दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सॉफ्ट हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून टीका होत असते. याच मुद्द्यावर केजरीवाल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “मी हिंदू असल्यामुळे मंदिरांना भेट देतो आणि त्यावर कोणाचाही आक्षेप नसावा,” असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितले. ते दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक मंदिरांना भेट देऊन सॉफ्ट हिंदुत्वात गुंतत आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल यांनी हे विधान केलं.

“तुम्ही मंदिरात जाता का? मी पण मंदिरात जातो. मंदिरात जाण्यात काहीही गैर नाही. मंदिराला भेट दिल्यानंतर शांतता वाटते. माझ्यावर सॉफ्ट हिंदुत्वाचा आरोप करणाऱ्यांचा आक्षेप काय आहे? मुळात त्यांचा आक्षेप का असावा?, मी हिंदू असल्यामुळे मंदिरात जात आहे. माझी पत्नी गौरीशंकर मंदिराला भेट देते,” असं  केजरीवाल म्हणाले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आम आदमी पक्षावर त्यांच्या तीर्थक्षेत्रांच्या योजनांचे अनुकरण केल्याचा आरोप केला होता, याबाबत बोलताना प्रमोद सावंत आम आदमी पक्षाची नक्कल करत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला.

“प्रमोद सावंत आमची नक्कल करत आहेत. मी वीज मोफत देऊ असे सांगितले तेव्हा त्यांनी पाणी फुकट दिले. मी रोजगार भत्ता देऊ असे सांगितले तेव्हा त्यांनी सुमारे १० हजार नोकऱ्यांची घोषणा केली आणि मी तीर्थयात्रेबद्दल बोललो तेव्हा त्यांनी त्यांच्या योजनेची घोषणा केली,” असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गोवा दौऱ्यात भंडारी समाजाच्या सदस्यांची भेट घेतली. तसेच कामगार संघटना आणि खाण आंदोलनाच्या नेत्या पुती गावकर यांनी केजरीवाल यांच्या उपस्थिती आम आदमी पक्षात प्रवेश केला.