बिन्यामिन नेतान्याहू यांच्यासह माझं अफेअर होतं अशी कबुली डॉ. रुथ बार यांनी ३३ वर्षांनी दिली आहे. ४ जानेवारी १९९३ ला नेतान्याहू यांनी इस्रायलच्या चॅनल १ ला एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनीही ही जाहीर कबुली दिली होती की त्यांचे रुथ बार यांच्यासह विवाहबाह्य संबंध होते. रुथ बार या नेतान्याहू यांच्यासाठी रणनीतीकार म्हणून काम करत होत्या. त्या दरम्यान या दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते.

बिन्यामिन नेतान्याहू यांचं अफेअर का चर्चेत आलं?

द मारिव्हचे पत्रकार बेन कॅस्पिट यांनी एक लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी १९९० च्या दशकाच्या अखेरीस गाजलेल्या टेप स्कँडलच्या दरम्यान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यासह रुथ बार यांचे विवाहबाह्य संबंध आहेत याबाबत भाष्य केलं होतं. रुथ बार या रणनीतीकार म्हणून काम करत होत्या. आता रुथ बार यांनीही याबाबत मौन सोडलं आहे. wionews ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

१९९३ च्या जानेवारी महिन्यात काय घडलं होतं?

१४ जानेवारी १९९३ रोजी घामाने पूर्ण भिजलेले आणि निराश दिसणारे बेंजामिन नेतान्याहू अचानक ‘चॅनल वन’च्या स्टुडिओमध्ये दाखल झाले. त्यांनी थेट प्रक्षेपणादरम्यान आपण लिकुड पक्षाच्या नेतृत्वासाठीच्या प्राथमिक निवडणूक प्रचार मोहिमेतील आपल्या रणनीती सल्लागारासोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याची कबुली दिली. ती महिला म्हणजे रुथ बार. त्यावेळी १९९२च्या निवडणुकीत यित्झाक शमीर यांचा यित्झाक रॉबिन यांच्याकडून पराभव झाल्यानंतर लिकुड पक्षाच्या पुढील प्रमुखाची निवड करण्यासाठीची प्राथमिक निवडणूक शिगेला पोहोचली होती. त्यानंतर आता ही चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

इस्रायलमध्ये अफेअरची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली होती

संपूर्ण इस्रायलमध्ये या घटनेची चर्चा सुरू झाली. त्यानंतर नेतान्याहू यांच्या पत्नी सारांनी त्यांना घरातून कायमचे बाहेर काढले. मात्र, नेहमीप्रमाणेच ते हळूहळू पुन्हा घरी परतले. संबंधित टेप मात्र कधीच सार्वजनिक करण्यात आली नाही. त्यावेळी रुथ बार यांचे नाव सार्वजनिक झाले होते. मात्र, त्या काळात सोशल मीडिया किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म अस्तित्वात नसल्यामुळे या प्रकरणाला आजच्या अर्थाने ‘ट्रेंड’ मिळाला नाही.

रुथ बार यांची त्या काळात कोणतीही मुलाखत घेण्यात आली नाही. त्या कधीही कॅमेऱ्यासमोर, माईकसमोरर किंवा पत्रकारांसमोर दिसल्या नाहीत. अनौपचारिक किंवा औपचारिक कोणत्याही कार्यक्रमात त्या माध्यमांसमोर आल्या नाहीत. त्यानंतर त्या कुठेही सार्वजनिकपणे दिसल्या नाहीत. त्यामुळे फारच मोजक्या राजकीय पत्रकारांना याबाबत माहिती होती. आता त्यांनीच या विषयी मौन सोडत ही बाब खरी असल्याचं म्हटलं आहे.