ब्रिक्स परिषदेनिमित्त रशियात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये योगाच्या विषयावर बराच वेळ चर्चा झाली. मी अजूनपर्यंत एकदाही योगा केलेला नाही, अशी स्पष्ट कबुली पुतीन यांनी मोदींसमोर यावेळी दिली. मात्र, मी जे खेळ खेळतो त्यामध्ये आणि योगात साम्य असावे, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मी आजवर ज्या लोकांना योगा करताना पाहिले आहे, तशाप्रकारची अचुकता आणणे मला अवघड वाटते. या एकाच गोष्टीमुळे मी आजपर्यंत योगा केला नसल्याचे पुतीन यांनी मोदींना सांगितले. पुतीन स्वत: ज्युडो, पोहणे आणि शिकारीच्या कलेत तरबेज असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या चर्चेवेळी मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतात झालेल्या कार्यक्रमात रशियाने सहभाग नोंदविल्याबद्दल पुतीन यांचे आभार मानले. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजपथावर झालेल्या या कार्यक्रमाला रशियासह १०० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी बोलताना पुतीन यांनी सरकारला योगाच्या प्रसारासाठी आयुष मंत्रालय स्थापन करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच मोदी वैयक्तिक जीवनात स्वत: योगा करतात का, असा सवालही त्यांनी विचारला होता.