Captain Smit Machhar talks with PM Modi Flydubai Cockpit Hanuman Chalisa: दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या फ्लायदुबई विमानातील सह-वैमानिकाचा घातपाताचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांचे जगभरात कौतुक होत आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून अबू धाबीमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. संपूर्ण देश तुमच्यासाठी प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी त्यांना सांगितले. कॉकपिटमध्ये झालेल्या थराराची माहिती देताना स्मित मच्छार म्हणाले की, जेव्हा जेव्हा मला वेदना होतात तेव्हा मी हनुमान चालीसा म्हणतो. त्यावेळीही मी हनुमान चालीसा म्हणत होतो.
तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेकडो लोकांचे प्राण वाचवले. भारतीय लोक प्राण घेणारे नाहीत तर प्राण वाचविणारे आहेत, हे तुम्ही जगासमोर सिद्ध केले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांचे कौतुक केले. त्यानंतर विमानात त्यावेळी नेमके काय घडले होते? असा प्रश्न विचारत घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी स्मित मच्छार यांनी कॉकपिटमधील थरार कथन केला. माझ्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या. मी खाली पडलो होतो, त्यावेळी विमान वेगाने खाली जात असल्याचे मला जाणवले. मी जर योग्य वेळी दरवाजा उघडला नसता तर अनर्थ घडू शकला असता, मला माझ्या जीवापेक्षा विमानातील प्रवाशांची काळजी वाटत होती, अशी माहिती त्यांनी दिली.
‘मी हनुमान चालीसा म्हणत होतो’
आपल्याला चांगल्या पद्धतीचे उपचार मिळाल्याचे कॅप्टन स्मित मच्छार यांनी यावेळी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले, “मी सकारात्मकतेवर विश्वास ठेवतो. मी जेव्हा वेदनेत असतो तेव्हा मी हनुमान चालीसा म्हणतो. विमानातील त्या प्रसंगावेळीही मी फक्त हनुमान चालीसा पुटपुटत होतो. देवच मला वाचवेल, असा विश्वास माझ्या मनात त्यावेळी होता. तुमचा फोन आल्यामुळे मला आता खूप छान वाटत आहे.” यावेळी कॅप्टन मच्छार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तुमच्यासमोर रडतोय, याबद्दल मला माफ करा, असे ते म्हणाले.
स्मित मच्छार पुढे म्हणाले, “मी रोज सकाळी जेव्हा देवपूजा करतो. तेव्हा माझा दोन वर्षांचा मुलगा माझ्याबरोबर बसतो. मी त्याला हनुमान चालीसा ऐकवतो. आम्ही आज देशापासून दूर असलो तरी आपल्या संस्कृतीपासून दूर गेलेलो नाहीत.”
‘तुमच्यामुळे भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला’
स्मित मच्छार यांच्या अतुलनीय धाडसाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “सोशल मीडियावर लोक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. जर तुम्ही हे रोखले नसते, तर भारताबद्दल काय काय विचार केला गेला असता, याची कल्पनाही करता येत नाही, अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत. भारताच्या सर्व वैमानिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा झाला असता. तुम्ही हे सर्व काही होण्यापासून टाळले. तुम्ही खूप मोठे कार्य केले आहे.”
गुजराती भाषेतही साधला संवाद
“कॉकपिटमध्ये नेमके काय झाले? हे तुमच्याकडून नंतर प्रत्यक्ष भेटून जाणून घेईल. कारण मोबाइलवर ते बोलणे योग्य होणार नाही. आज महात्मा गांधींची जयंती आहे. अंहिसा काय असते, हे तुम्ही दाखवून दिले आहे”, असे सांगून पंतप्रधान मोदींनी त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मच्छार यांच्याशी गुजरातीमधून आपुलकीचा संवाद साधला.
