पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राजभाषेवर विशेष भर दिला आहे, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सांगितले की, मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते. ते वाराणसी शहराच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी वाराणसीमध्ये अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला संबोधित करताना शाह म्हणाले, “मला गुजराती भाषेपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते. आपल्याला आपली राजभाषा मजबूत करण्याची गरज आहे.”

“गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीचे लोकचळवळीत रूपांतर केले; त्यात स्वराज्य, स्वदेशी आणि स्वभाषा असे तीन स्तंभ होते. स्वराज्य प्राप्त झाले, पण स्वदेशी आणि स्वभाषा मागे राहिल्या. हिंदी आणि आपल्या सर्व स्थानिक भाषांमध्ये कोणताही संघर्ष नाही. आम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली राजभाषेवर विशेष भर दिला आहे,” असं त्यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील वाराणसीतील ‘अखिल भारतीय राजभाषा संमेलन’ मध्ये उपस्थित होते. वाराणसीतील दीनदयाल हस्तकला संकुल येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात शाह यांनी त्यांच्या भाषणापूर्वी एका हिंदी मासिकाचे प्रकाशन केले. याशिवाय शाह यांनी वाराणसीतील कालभैरव मंदिरात प्रार्थना केली. शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशचे निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानही उपस्थित होते.