Donald Trump reacts on Cole Thomas Allen Manifesto: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाइट हाऊसमधील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित असलेल्या कार्यक्रमात गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला. ‘व्हाइट हाऊस करस्पाँडंट असोसिएशन’तर्फे शनिवारी वॉशिंग्टन हिल्टन येथे वार्षिक स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने आरोपी कोल टॉमस ॲलनने (वय ३१) गोळीबार केला. सुरक्षा रक्षकांनी कोल टॉमस ॲलनला अटक केली असून त्याने ट्रम्प यांच्या विरोधात लिहिलेल्या जाहिरनाम्याची आता चर्चा होत आहे. यावर एका मुलाखतीमध्ये ट्रम्प यांना थेट प्रश्न विचारला असता त्यांनी संताप व्यक्त केला.

हल्ला करण्यापूर्वी आरोपी कोल टॉमस ॲलनने ट्रम्प यांच्या विरोधात ‘अँटी-ट्रम्प मॅनिफेस्टो’ लिहिला होता. यातील मजकूर बाहेर आल्यानंतर गोळीबाराची घटना फक्त हल्ल्यापुरती मर्यादित राहिली नसून त्यावर आता राजकीय वाद निर्माण झाला आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर काही तासांतच ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याची माहिती दिली होती. हल्ला झाला त्यावेळी मंचावर ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि त्यांच्या पत्नी, तसेच व्हाइट हाऊस करस्पाँडंट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प यांनी सीबीएस न्यूजच्या पत्रकार नोरा ओ’डोनेल यांच्या ‘६० मिनिट्स’ या कार्यक्रमात मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांना कोल टॉमस ॲलनच्या जाहिरनाम्याबद्दल आणि त्यातील बलात्कारी, लैंगिक शोषणाच्या आरोपाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र ट्रम्प यांनी या आरोपांना फेटाळून लावलेच, त्याशिवाय संतापही व्यक्त केला.

‘मी कुणावरही बलात्कार केला नाही’

पत्रकार नोरा ओ’डोनेल यांनी आरोपीचा जाहिरनामा वाचून दाखवताच ट्रम्प चांगलेच संतापले. त्यांनी म्हटले, “मी याचीच वाट पाहत होतो की, केव्हा तुम्ही हे वाचाल. कारण मला माहीत होते की, तुम्ही हा प्रश्न विचाराल. त्याने काहीही लिहिले असले तरी मी बलात्कारी नाही. मी कुणावरही बलात्कार केला नाही.”

White House Wine-Gate
गोळीबार सुरू अन् पाहुणे दारूच्या बाटल्या घेऊन पळाले! ट्रम्प गोळीबार प्रकरणाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

पत्रकार नोरा ओ’डोनेल यांनी पुढे विचारले की, ‘पण हल्लेखोराने तुमच्याबद्दलच लिहिले आहे, हे कशावरून?’. आरोपीच्या जाहिरनाम्यात ट्रम्प यांचा नावाचा उल्लेख नव्हता. मात्र तरीही ट्रम्प यांचा रागाचा पारा चढलेला दिसला. ते म्हणाले, “मी लहान मुलांचे लैंगिक शोषण केले नाही. मला माफ करा, पण हे केलेले नाही. एका मानसिक रोगी व्यक्तीने लिहिलेला घाणेरडा मजकूर तुम्ही वाचत आहात. माझे नाव अशा गलिच्छ बाबींशी जोडले गेले, ज्याचा माझा काडीचाही संबंध नाही. तुम्हालाही हा मजकूर वाचताना लाज वाटायला हवी होती. पण ठिक आहे, आपण ही मुलाखत पूर्ण करू.”

तो मनोरुग्ण माणूस

हल्लेखोराबाबत बोलताना ट्रम्प पुढे म्हणाले, “मी त्याचा जाहिरनामा वाचला. तो कट्टरपंथी बनलेला वाटतो. तो पूर्वी ख्रिश्चन आणि श्रद्धाळू होता. मात्र तो आता ख्रिश्चन विरोधी बनला आहे. तो कदाचित मनोरुग्ण असावा.”

मेलेनिया ट्रम्प खंबीर

डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेवरून विरोधक डेमोक्रॅट्स यांनाही सुनावले. अमेरिकेतील हिंसाचाराच्या घटनांवर डेमोक्रॅटिक नेत्यांकडून द्वेषपूर्ण विधाने करण्यात येत असून हे खूपच धोकादायक आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. “मी अशा जोखमीच्या परिस्थितीतून अनेकदा गेलो आहे. माझ्या पत्नीला याचा फारसा सामना करावा लागलेला नाही. तिने उत्तमरित्या परिस्थिती हाताळली. त्या खूप खंबीर आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर आम्ही एका रुममध्ये काही काळ थांबलो आणि त्यानंतरही कार्यक्रम सुरू राहील का? याची चाचपणी केली.”

दोन वर्षांत तिसरा हल्ला

हल्ल्याबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प असेही म्हणाले की, गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर मला अजिबात भीती वाटली नाही. मला जीवनाचा संघर्ष चांगला माहीत आहे. आपण एका विचित्र जगात राहत आहोत.”

trump gala shooting witness eating food armed guard viral
गोळीबाराच्या थरारातही हा पठ्ठ्या जेवत बसला! ट्रम्प यांच्या कार्यक्रमातील ‘त्या’ पाहुण्याचा VIDEO व्हायरल

मागच्या दोन वर्षांत ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याची ही तिसरी घटना आहे. वॉशिंग्टन हिल्टन येथे हल्ला झाल्यानंतर उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांना सिक्रेट सर्व्हिसच्या सुरक्षा रक्षकांनी काही सेकंदात तिथून बाहेर काढण्यात आले. मात्र ट्रम्प यांना मंचावरून बाजूला नेण्यास थोडा विलंब झाला. याबद्दल मुलाखतीत ट्रम्प यांना विचारले असता ते म्हणाले, “तिथे काय चालले आहे, हे मला पाहायचे होते. त्यामुळे त्यांना म्हणालो, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. मला बघू द्या काय चाललंय. त्यामुळे थोडासा विलंब झाला असावा.”