पाटण्यात ‘आय-पॅक’ संस्थेची स्थापना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे निवडणूक ‘मायक्रोमॅनेजमेंट’ बिहारमध्ये उध्वस्त करून त्यांना चारी मुंडय़ा चीत करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी आता नव्या उपक्रमाची सुरूवात केली आहे. आय-पॅक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमासाठी देशभरातून संशोधक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून नवख्या विद्यार्थ्यांनादेखील लक्षावधी रूपयांचे ‘पॅकेज’ देण्यात आले आहे. संसदीय कामकाजाचा अभ्यास व विश्लेषण करणाऱ्या ‘पीआरएस’ संस्थेच्या अध्ययकांना (फेलो) आय-पॅकने निवडणूक व्यवस्थापनासाठी ‘ऑफर’ दिली आहे. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मोठय़ा प्रमाणावर निवडणूक व्यवस्थापनाची चर्चा झाली. भाजप व नरेंद्र मोदी यांनी प्रशांत किशोर यांनाच या कामी नेमले होते. ‘चाय पे चर्चा’ पासून ते ‘निचली राजनिती’ पर्यंतची आखणी प्रशांत किशोर यांनी केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप अध्यक्ष झालेल्या अमित शहा यांच्याशी मतभेद झाल्याने प्रशांत किशोर यांनी बिहारचा रस्ता धरला व थेट मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी हातमिळवणी केली. निवडणूक नियोजन, माहिती गोळा करणे, संदर्भ पाहणी, प्रत्यक्ष प्रचारात सहभाग, प्रसारमाध्यमांचा वापर, सोशल नेटवर्किंग साईट्चा वापर, संशोधन, विश्लेषण आदीची आवड असलेल्या युवकांची चार स्तरावर निवड होणार आहे. ज्यात सर्वप्रथम परिचय पत्राची निवड, फोनवरून संभाषण, प्रकरण (केस) अभ्यास व सरतेशेवटी मुलाखत- अशी निवड प्रक्रिया असेल. त्यात उत्तीर्ण झालेल्यांना वर्षांला लाखो रूपयांचे ‘पॅकेज’ निश्चित करण्यात आले आहे. अलीकडेच या विद्यार्थ्यांच्या मुलाखती नोएडात गुरूवारी पार पडल्या आहेत. पाटण्यात मुख्यालय प्रशांत किशोर यांनी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापनाचे व्यावसायिक संस्थाकरण केले आहे. त्यासाठी त्यांनी ‘आय-पॅक’ नावाची सल्लागार संस्था उभारली आहे. या संस्थेचे मुख्यालय पाटण्यात असेल. अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाचे कंत्राट ‘आय-पॅक’ ने घेतले नसले तरी भविष्यात पंजाब, पश्चिम बंगालमधील मोठे नेते प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा करीत आहेत.