संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) प्रमुखांची हकालपट्टी आपल्याच शिफारशीवरून झाल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी स्पष्ट केले. या संस्थेचे प्रमुख अविनाश चंदर यांची त्यांचे कंत्राट संपण्याच्या १५ महिने आधीच पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील नियुक्ती समितीने त्यांच्या हकालपट्टीला मान्यता दिली असून, त्यांना ३१ जानेवारीपासून सेवामुक्त करण्यात येणार आहे. चंदर हे संरक्षण मंत्र्यांचे सल्लागारही होते. आता स्वतः पर्रिकर यांनीच चंदर यांच्या निलंबनाची शिफारस केल्यामुळे या विषयाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
चंदर यांच्या जागेवर नव्याने कोणाला नियुक्त करायचे, याचा निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे पर्रिकर यांनी सांगितले. एवढ्या वरिष्ठ पदावरील व्यक्तीने कंत्राटावर काम करावे, अशी आपली इच्छा नसल्याचेही ते म्हणाले.