भारतीय सनदी अधिकारी दिव्या मित्तल या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर या ठिकाणी त्या जिल्हाधिकारी होत्या. त्यांनी १३ वर्षे काम केल्यानंतर आता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या एक उत्तम अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. आपण आता या प्रवासातून पुढे जायला तयार आहोत असं दिव्या मित्तल यांनी म्हटलं आहे.

दिव्या मित्तल मागील १३ वर्षांपासून सरकारी अधिकारी म्हणून होत्या कार्यरत

आज मी स्वतःच्या इच्छेने IAS अधिकारी म्हणून राजीनामा देते आहे. मी माझ्या १३ वर्षांच्या प्रवासातून पाऊल मागे घेतलं आहे असं म्हणत दिव्या मित्तल यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. २०१३ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या दिव्या मित्तल यांना २ सप्टेंबर २०१३ रोजी नियुक्त करण्यात आलं होतं. सुरुवातीला त्यांची नियुक्ती मेरठ या ठिकाणी झाली होती. त्यानंतर गोंडा, कानपूर, बरेली, संत कबीर नगर या ठिकाणी ही त्या कार्यरत होत्या. सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत मिर्झापूरच्या जिल्हाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. जुलै २०२४ पासून त्या देवरियाच्या जिल्हाधिकारी होत्या. मे महिन्यात त्यांनी लखनऊ या ठिकाणी महसूल विभागाच्या विशेष सचिव म्हणूनही त्या कार्यरत होत्या. ही त्यांची शेवटची सरकारी नियुक्ती ठरली.

लंडनची नोकरी सोडून भारतात परतल्या होत्या दिव्या मित्तल

दिव्या मित्तल यांनी आयआयटी दिल्ली आणि आयआयएम बंगळुरु येथून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आहे. शिक्षणानंतर त्यांना लंडनमध्ये नोकरी मिळाली होती. परदेशात चांगलं करिअर असूनही त्यांनी आपल्या देशासाठी काहीतरी करावं या अपेक्षेने ती नोकरी सोडून भारतात परतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आणि त्या सनदी अधिकारी झाल्या. सरकारी सेवा करताना मला खूप काही शिकायला मिळालं असंही दिव्या मित्तल यांनी म्हटलं आहे.

लोकांसाठी फाईलमधला कागद हा निव्वळ कागद नाही तर दिलासा

दिव्या मित्तल यांनी म्हटलं आहे की सरकारी सेवेत काम करत असताना वेगवेगळे अनुभव आले आहेत. कुठल्याही सरकारी फाईलच्या मागे फक्त एक कागद नसतो. तर एखाद्या व्यक्तीशी जोडली गेलेली आशा असते. एखाद्या माणसाचं आयुष्य त्या कागदाशी जोडलं गेलेलं असतं. जमिनीचा अधिकार मिळणारं कुटुंब असो, सन्मानाने आयुष्य जगण्याचा अधिकार असो किंवा शेतापर्यंत पाणी मिळण्याची शेतकऱ्याला मिळालेली मंजुरी असो. लोकांना त्यांचे अधिकार देणारा तो कागद ठरतो.

मला खूप काही शिकायला मिळलं

मी देवरियामध्ये होते. मला इथे शिकायला मिळालं की योग्य बाजूने उभं राहणं हा एखादा पर्याय नाही तर ते आपलं परम कर्तव्य आहे. माझं शिक्षण, आत्मविश्वास, जगात मान उंच करुन चालण्याचा आत्मविश्वास हे सगळं मला या नोकरीने दिलं. मी मूर्ख होते. मला वाटलं होतं की काहीतरी द्यायला आले आहे. पण वास्तव हे आहे की मी या नोकरीत खूप काही शिकले आहे. मोठा अनुभव गाठीशी घेऊन चालले आहे. आज ही सेवा सोडत असताना डोळ्यांत पाणी आहे. आजही माझ्यासमोर लहुरिया गावातल्या डोंगरात ती वृद्ध आई आहे जिने पहिल्यांदा पाणी गावात पोहचताना पाहिलं. तिने थरथरत्या हाताने माझ्या डोक्याला हात लावून आशीर्वाद दिला होता. आज माझं पद सुटलं, पण तो स्पर्श मी आज बरोबर घेऊन चालले आहे. माझ्या देशाच्या मातीने जे स्वप्न मला दिलं ते मी बरोबर नेते आहे अशी भावूक पोस्ट दिव्या मित्तल यांनी केली आहे.