मला पक्षातून निलंबित करण्यासाठी माझी चूक काय झालीये, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले पाहिजे, अशी मागणी भाजपतून हकालपट्टी करण्यात आलेले खासदार कीर्ती आझाद यांनी गुरुवारी केली. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर लगेचच पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत कीर्ती आझाद यांची भाजपतून हकालपट्टी केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच कीर्ती आझाद यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
ते म्हणाले, जर सत्य परिस्थितीचे कथन करणे हा गुन्हा असेल, तर मी वारंवार हा गुन्हा करतच राहिन. मला पक्षातून निलंबित करताना मी चूक काय केली आहे, याचे उत्तर पंतप्रधानांनी दिलेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
आपण केवळ डीडीसीएतील भ्रष्टाचाराविरोधात बोललो होतो. कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतलेले नव्हते. त्यामुळे माझ्यावर लावण्यात आलेला शिस्तभंगाचा आरोप चुकीचा असल्याचेही कीर्ती आझाद यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सुद्धा कीर्ती आझाद यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. राहुल गांधी म्हणाले की, मोदी म्हणत होते की ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ आता पक्षातीलच एका सदस्याने भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याचीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मोदींनी याचे उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.