जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 रद्द केल्यापासून पाकिस्तान चांगलाच खवळला आहे. याचीच प्रचिती आज मुझफ्फराबाद या ठिकाणीही आली. या ठिकाणी झालेल्या सभेत इम्रान खान यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच आगामी काळात मी काश्मीरचा राजदूत म्हणून जगासमोर जाईन असंही वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे सांगू इच्छितो मी जगभरात काश्मीरचा साफिर (राजदूत) म्हणून फिरेन. पाकिस्तान हाच काश्मीरचा राजदूत आहे हे जगासमोर आणेन” असेही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदूंची कट्टरपंथीय संघटना आहे. मुस्लिम, ख्रिश्चन आणि सर्व अल्पसंख्याकांचा द्वेष करणं हेच त्यांचे धोरण आहे. मुस्लिमांनी शेकडो वर्षे भारतावर राज्य केलं त्याचमुळे आरएसएस ही संघटना मुस्लिम समाजाचा द्वेष करते ” असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

एवढंच नाही तर मुझफ्फराबाद येथील युवकांच्या भावनाही इम्रान खान यांनी त्यांच्या भाषणातून भडकवल्या. “LoC अर्थात नियंत्रण रेषेजवळ कधी जायचं आहे ते मी सांगेन. तुम्ही त्यावेळी खुशाल घुसखोरी करु शकता. तुमच्या मनात काय सुरु आहे मला ठाऊक आहे. तुम्हाला नियंत्रण रेषेजवळ जायचं आहे. मात्र तूर्तास तिथे जाऊ नका. मला संयुक्त राष्ट्रांसमोर जाऊद्यात मी तुम्हाला सांगेन की नियंत्रण रेषेजवळ नेमकं कधी जायचं आहे. मला काश्मीर प्रकरण संयुक्त राष्ट्रांसमोर मांडू दे. काश्मीर प्रश्न सोडवला नाही तर त्याचा परिणाम सगळ्या जगावर होईल” असं इम्रान खान म्हटले. दरम्यान मुझफ्फराबाद या ठिकाणी निघालेली इम्रान खान यांची रॅली हा फ्लॉप शोच ठरली. कारण या रॅलीसाठी रावळपिंडी आणि अबोटाबाद या ठिकाणाहून ट्रकने माणसं आणण्यात आली होती. असं चळवळकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी सांगितलं.