“देवाचे आभार माना RSS चा जन्म झाला, तुमची आई ख्रिश्चन असल्याने…”; ‘हिंदूविरोधी’ वक्तव्यावरुन भाजपा नेत्याची राहुल गांधींवर टीका

“आम्हाला हिंदू असण्याची लाज वाटत नाही. नेहरु असतानाच देशाचं विभाजन झालं, हजारो हिंदू मारले गेले,” असंही या भाजपा नेत्याने प्रतिक्रिया देताना म्हटलंय.

Rahul And Sonia Gandhi
दिल्लीत भाषणात केलेल्या वक्तव्यावरुन एफआयआर दाखल करणार (प्रातिनिधिक फोटो सौजन्य पीटीआय)

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे धर्माचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करणारे ‘बनावट हिंदू’ आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. काँग्रेसची विचारसरणी भाजप- संघाच्या अगदी विरुद्ध असून, यापैकी एकच विचारसरणी देशावर सत्ता गाजवू शकते, असे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीमध्ये भाषण करताना राहुल म्हणाले. मात्र आता या ‘हिंदूविरोधी’ वक्तव्याप्रकरणी भाजपा आमदाराकडून राहुल यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

भाजपाचे भोपाळमधील आमदार रामेश्वर शर्मा यांनी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केलाय. “राहुल गांधीजी तुम्ही स्वत: हिंदू नसून तुमचे पूर्वजही हिंदू नव्हते. आम्हाला हिंदू असण्याची लाज वाटत नाही. नेहरु असतानाच देशाचं विभाजन झालं, हजारो हिंदू मारले गेले. देवाचे आभार माना की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला,” असं म्हणत शर्मा यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधलाय.

तसेच बुधवारी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मी उद्या (म्हणजेच गुरुवारी, १६ सप्टेंबर २०२१ रोजी) राहुल गांधीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचंही शर्मा म्हणालेत. “मी राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल करणार आहे. त्यांनी हिंदू देवी, देवतांचा अपमान केल्याप्रकरणी माफी मागायला हवी. तुमची आई आणि बहिणीचा नवरा हे ख्रिश्चन आहेत. त्यामुळे तुमच्यात हिंदूंचं रक्त आहे असं दिसत नाही. हिंदू देवतांचा अपमान थांबवा,” असं शर्मा म्हणाले आहेत.

देवी दैवतांबद्दल राहुल काय म्हणाले होते?

देवी लक्ष्मी ही आपल्याला आपले लक्ष्य साध्य करण्यास मदत करणारी शक्तीची देवता आहे, तर दुर्गा देवी ही संरक्षण करणारी शक्तीची देवता आहे. आपल्या पक्षाने सरकारमध्ये असताना या शक्तींना बळ दिले आहे, सत्ताधारी भाजपने या शक्ती क्षीण केल्या आहेत, असे राहुल यांनी म्हटले होते. ‘हे कशाप्रकारचे हिंदू आहेत? हे खोटे हिंदू आहेत. हे हिंदू धर्माचा वापर करतात, धर्माची दलाली करतात, पण हे हिंदू नाहीत’, असा हल्लाबोल राहुल यांनी केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: I will lodge an fir against rahul gandhi for insulting hindu gods says rameshwar sharma bjp mla from bhopal scsg