Prashant Kishor On Bihar Election Result 2025 : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएला मोठं यश मिळालं, तर विरोधकांचा दारूण पराभव झाला. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या पक्षालाही बिहारच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला. जनसुराज पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. दरम्यान, निवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केली आहे.
प्रशांत किशोर हे पुढील पाच वर्षांत त्यांच्या उत्पन्नातील ९० टक्के रक्कम आता त्यांच्या पक्षाला दान करणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत त्यांनी केली आहे. यावेळी प्रशांत किशोर यांनी बिहारच्या जनतेसमोर एक नवी अट ठेवल्यामुळे चर्चा रंगली आहे. जनसुराज पक्षाच्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी बिहारच्या जनतेनी एक हजार रुपयांची मदत (देणगी) करण्याचं आवाहन प्रशांत किशोर यांनी केलं आहे. मात्र, जे पक्षाला एक हजार रुपये देणार नाहीत, त्यांना आपण भेटणार नाही, अशी अटच प्रशांत किशोर यांनी ठेवली आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.
पराभवानंतर प्रशांत किशोर यांची पहिली मोठी घोषणा
प्रशांत किशोर हे पुढील पाच वर्षांत त्यांच्या उत्पन्नातील ९० टक्के रक्कम त्यांच्या पक्षाला म्हणजे जनसुराज पक्षाला देणार आहेत अशी घोषणा त्यांनी केली आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, “गेल्या २० वर्षात मी जी काही संपत्ती मिळवली, ती सर्व संपत्ती फक्त दिल्लीतील माझं घर वगळता, मी ती पक्षासाठी दान करणार आहे.” बिहार विधानसभा निवडणुकीत जनसुराज पक्षाला पराभवाचा धक्का बसल्यानंतर काही दिवसांतच प्रशांत किशोर यांनी ही घोषणा केली.
‘जनसुराज’चा पराभव का झाला? प्रशांत किशोर यांनी काय म्हटलं?
बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रशांत किशोर नुकतीच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले, पण ते पूर्णपणे अयशस्वी झाले. हे मान्य करण्यात काही गैर नाही. आम्ही बिहारच्या सत्तेत बदल घडवून आणू शकलो नाही. मात्र, बिहारचं राजकारण बदलण्यात आम्ही नक्कीच काही महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. आमच्या प्रयत्नांमध्ये म्हणजे जनतेने आम्हाला निवडून दिलं नाही, त्यात काही चूक झाली असेल. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला नाही, त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. मी ती जबाबदारी १०० टक्के स्वतःवर घेतो की मी बिहारच्या लोकांचा विश्वास जिंकू शकलो नाही”, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.
