चेन्नईकडून पोर्ट ब्लेअरकडे निघालेले भारतीय वायूदलाचे विमान शुक्रवारी सकाळी बेपत्ता झाले. या विमानामध्ये २९ प्रवासी असून, त्यामध्ये सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भारतीय वायूदलाचे अधिकारी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत या विमानाच्या संपर्कात होते. पण हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ८.१२ पर्यंत या विमानाचा संपर्क होता.
विमानाच्या शोध घेण्यासाठी वायूदलाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले असून, नौदलाच्या चार नौका विमानाच्या शोधासाठी बंगालच्या उपसागरात पाठविण्यात आल्या आहेत. चेन्नईहून उड्डाण केल्यावर सकाळी ८ वाजून १२ मिनिटांपर्यंत या विमानाचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क होता. त्यानंतर मात्र विमानाचा संपर्क तुटल्याची माहिती मिळाली आहे. विमानामध्ये वायूदलातील अधिकाऱ्यांसह सहा कर्मचारी होते. एएन-३२ हे द्विइंजिनचे विमान भारतीय सैन्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येते. खराब हवामानामुळे त्याचा संपर्क तुटल्याची माहिती मिळते आहे. पण याला अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.