पीटीआय, नवी दिल्ली
आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर उतरत असताना रशियन बनावटीच्या ‘अँटोनोव्ह एएन-३२’ या विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन अधिकारी आणि दोन अग्निवीरांचा समावेश असल्याची माहिती हवाई दलाने दिली. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
हवाई दलाच्या माहितीनुसार सकाळी १० च्या सुमारास नियमित उड्डाणादरम्यान (सॉर्टि) या विमानाला अपघात झाला. धावपट्टीवर उतरताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले. त्यानंतर ते समांतर टॅक्सीवेवरून वेगाने पुढे गेले, त्याचे दोन तुकडे झाले आणि त्याला आग लागली. या घटनेनंतर जोरहाट हवाई तळाच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. एएन-३२ हे रशियन बनावटीचे, दोन इंजिन असलेले लष्करी वाहतूक करणारे विमान होते.
या दुर्घटनेत स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम हे ठार झाले. या विमानात एकूण सहा जण होते. विमानाचा सह-वैमानिक जखमी झाला असून त्याला जोरहाट येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एएन-३२ हे रशियन बनावटीचे, दोन इंजिन असलेले लष्करी वाहतूक करणारे विमान आहे. ही विमाने अनेक दशकांपासून भारतीय हवाई दलासाठी एक विश्वासार्ह साधन म्हणून सेवा देत आहेत.
१० वर्षांत तीन अपघात
– गेल्या १० वर्षांत ‘एन-३२’ विमानांचा हा तिसरा मोठा अपघात आहे. २०१६ पासून यापैकी किमान दोन विमाने कोसळली असून, त्यात हवाई दलाचे ४२ जण दगावले.
– २२ जुलै २०१६ रोजी चेन्नईतील तांबरम हवाई तळावरून पोर्ट ब्लेअरकडे जाताना बंगालच्या उपसागरावरून उड्डाण करत असताना विमान बेपत्ता झाले. या दुर्घटनेत २९ जण ठार.
– ३ जून २०१९ रोजी अरुणाचल प्रदेशातील वेस्ट सियांग जिल्ह्यातील मेचुका येथे (चीनच्या सीमेजवळ) जात असताना ‘एएन-३२’ विमान डोंगराळ भागात कोसळले. या विमानात असलेले १३ जण मृत्यूमुखी.
