भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी फायटर विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात जो संघर्ष झाला त्यामध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनीच पाकिस्तानचे अत्याधुनिक F-16 फायटर विमान पाडले. इंडियन एअर फोर्समधील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

मिग २१ बायसन विमानाला अॅमराम मिसाइल धडकण्याआधीच अभिनंदन यांनी F-16 वर R-73 मिसाइल डागले असे एअर फोर्समधील सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानला स्वसंरक्षणार्थ आणि दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी अमेरिकेने आपले अत्याधुनिक F-16 लढाऊ विमान दिले आहे. यामुळे पाकिस्तानने भारतावर हल्ल्यासाठी F-16 वापरल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन फायटर विमानांमध्ये आकाशात लढाई होते. तेव्हा त्याला डॉगफाईट म्हणतात. या डॉगफाईटमध्ये भारतीय हवाई दलाकडून फक्त अभिनंदन यांनीच R-73 मिसाइल डागले. मिग-२१ बायसन पडण्याआधीच्या शेवटच्या रेडिओ संदेशातून ही बाब स्पष्ट झाली आहे. मिग-२१ पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. भारताने चहूबाजूंनी पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणल्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानने अभिनंदन यांना भारताकडे सोपवले.