हवाई दलाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी येत्या बुधवारपासून हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तीन दिवसीय बैठक होणार आहे. भारत-चीन यांच्यातील वाढता तणाव लक्षात घेता राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी लडाख क्षेत्रात तैनात करण्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
हवाई दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या या बैठकीत मुख्यत: लडाखमधील आव्हानांबाबत, तसेच भारत-चीन ताबा रेषेवरील संवेदनशील भागांत हवाई दलाची संरक्षण सज्जता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. यात अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि उत्तराखंडलगतच्या भागांचा समावेश आहे, असे सुत्रांनी सांगितले. राफेलच्या पहिल्या सहा विमानांची तुकडी पुढील महिन्याच्या आरंभीच लडाखमध्ये सज्ज ठेवण्याबाबत हवाई दलाचे अधिकारी आग्रह धरण्याची शक्यता आहे.
राफेल कंपनीकडून ही विमाने जुलैच्या अखेरीस हवाई दलाच्या ताब्यात दिली जाणे अपेक्षित आहे, असेही सुत्रांचे म्हणणे आहे.
