Tejas Crashes Pilot Dead: दुबई एअर शो २०२५ मध्ये शुक्रवारी धक्कादायक घटना घडली. हवाई प्रदर्शन सुरू असताना भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानाचा अपघात झाला. काही सेकंदात तेजस जमिनीवर कोसळले. यात वैमानिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुबईच्या अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. यामुळे प्रदर्शन पाहायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली. भारतीय हवाई दलाने आता या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दुबई मीडिया ऑफिसने अपघात स्थळाचा एक फोटो एक्स हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये तेजस विमानाचा ढिगारा दिसून येत आहे. दुबईच्या अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक वेळेनुसार दुपारी २.१० वाजता तेजस विमान कोसळले.

हवाई दलाने काय म्हटले?

हवाई दलाच्या एक्सवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात म्हटले, “एअर शोदरम्यान तेजसचा अपघात झाला. यात वैमानिक गंभीर जखमी झाला होता. ज्यात त्याचा मृत्यू झाला. सदर जीवितहानीबद्दल आम्हाला तीव्र दुःख होत आहे. शोकाकुल कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त करतो.”

याचबरोबर अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असेही हवाई दलाने सांगितले.

संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, भारतीय सशस्त्र दलातील सर्व अधिकारी शोकाकुल कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.

युएई सरकारने काय म्हटले?

संयुक्त अरब अमिराती (युएई) सरकारने सांगितले की, अग्निशमन आणि आपत्कालीन पथकांनी अपघातानंतर तातडीने प्रतिसाद दिला आणि घटनास्थळाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

शेवटच्या काही सेकंदात काय घडले?

प्राथमिक माहितीनुसार, दुपारी २ वाजून १० मिनिटांनी विमानाच्या उड्डाणाचे प्रात्यक्षिक दाखवत असताना विमान कोसळले. उड्डाणानंतर काही क्षणातच लढाऊ विमान वेगाने खाली येत कोसळले. त्यामुळे आकाशात आगीसह काळ्या धुराचे लोट पसरले. एअर शो पाहायला आलेल्या अनेक प्रेक्षकांच्या समोर ही घटना घडली.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले?

स्थानिक माध्यमांशी बोलत असताना प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळेतच अपघात घडला. काहींनी सांगितले की, विमान कोसळताच त्या ठिकाणी आपत्कालीन पथके तातडीने दाखल झाले.