IAF officer Shubham Kumar Wife Missing with Rs 21 Lakh check: भारतीय हवाई दलाचे पायलट फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार हे विमान अपघातात शहीद झाल्यानंतर आता त्यांचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शुभम हा कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती होता, त्याच्या अचानक जाण्याने आता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, अशी प्रतिक्रिया शुभम कुमार यांचे वडील अमरेंद्र शर्मा यांनी दिली. त्यातच नुकसान भरपाईपोटी मिळालेला २१ लाख रुपयांचा धनादेश घेऊन शुभम कुमार यांच्या पत्नीने पळ काढल्यामुळे कुटुंब धक्क्यात आहे.

अंत्ययात्रेनंतर पत्नी निघून गेली

शुभम कुमार यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नी श्रेया राय या आझमगडहून बिहारला आल्या. त्यांनी शुभम कुमार यांच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला. पण त्यानंतर जे झाले, त्याने शुभमच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

जागरण या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, हुलासगंजचे सीओ यांनी श्रेया राय यांना २१ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला होता. शुभम यांचे वडील अमरेंद्र शर्मा यांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी सीओंना याबाबत विचारले असता त्यांनी धनादेश पत्नीकडे दिल्याचे सांगितले.

Assam iaf plane crash
आसाममधील जोरहाट येथे भारतीय वायू दलाच्या ‘एएन-३२’ या विमानाचा शनिवारी सकाळी अपघात झाला. 

अमरेंद्र शर्मा म्हणाले, “जर माझ्या मुलाने श्रेयाशी लग्न केले असेल तर तिला धनादेश दिला असावा, याला आमची हरकत नाही. पण धनादेश मिळताच ती निघून गेली. ती आमच्याबरोबर थांबून आम्हाला धीर देऊ शकली असती. श्राद्ध होईपर्यंत तरी तिने थांबायला हवे होते. पण सीओ आणि श्रेया यांनी मला धनादेशाबाबत अंधारात ठेवले.”

शुभम कुमार यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम आणि श्रेया एकमेकांवर प्रेम करत होते. दोन्ही कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली होती. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. मात्र शुभम यांच्या आजीचे निधन झाल्यामुळे लग्न पुढील वर्षी ढकलले गेले.

तत्पूर्वी दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केल्याचे बोलले जात आहे. मात्र शुभमच्या कुटुंबीयांनी याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले.

Flight Lieutenant Shubham Kumar last rites
पायलट शुभम कुमार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना आवाहन

अमरेंद्र शर्मा यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. मुलाच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंब अडचणीत सापडले असून आम्हाला मदत आणि न्यायाची अपेक्षा आहे, असे वडिलांनी सांगितले.

आसाम येथे कोसळले विमान

शनिवारी (१३ जून) आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर उतरत असताना रशियन बनावटीच्या ‘अँटोनोव्ह एएन-३२’ या विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. ज्यात दोन अधिकारी आणि दोन अग्निवीरांचा समावेश असल्याची माहिती हवाई दलाने दिली.

या दुर्घटनेत स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमाराम कुमावत आणि अग्निवीर दानिश आलम हे ठार झाले. या विमानात एकूण सहा जण होते. विमानाचा सह-वैमानिक जखमी झाला असून त्याला जोरहाट येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.