IAF Wing Commander Rape Accused in Jammu Kashmir : भारतीय वायू दलातील एका महिला फ्लाइंग अधिकाऱ्याने श्रीनगर येथील वायूदलाच्या मुख्यालयात जाऊन तिच्यावर विंग कमांडरने बलात्कार केल्याची, तिचा लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी वायूदलाने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. जम्मू-काश्मीरमधील वायूदलाच्या स्थानकात ही घटना घडल्याचं महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे. दुसऱ्या बाजूला जम्मू-काश्मीर पोलिसांनी महिला फ्लाइंग अधिकाऱ्याच्या तक्रारीवर वायूदलाच्या स्थानकातील विंग कमांडरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बडगाम पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ (२) अंतर्गत वायू दलाच्या विंग कमांडरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कलम वरिष्ठ पदावरील व्यक्तींसाठी आहे. महिलेने विंग कमांडरविरोधात बलात्कार, लैंगिक छळ, मानसिक छळ व पाठलाग केल्याचा आरोप केला आहे. ही घटना ३१ डिसेंबर २०२३ रोजी ऑफिसर्स मेसमध्ये घडल्याचं तिने सांगितलं. वायूदलाच्या स्थानकात नववर्षानिमित्त पार्टीचं आयोजन केलं होतं. तेव्हाच विंग कमांडरने तिच्यावर बलात्कार केल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. विंग कमांडरने तिला त्याच्या खोलीत बोलावलं व हे दुष्कृत्य केल्याचं महिलेने सांगितलं.

हे ही वाचा >> Railway Tracks : रेल्वे रुळावर सिमेंटचे ब्लॉक टाकून मालगाडी रुळावरून उतरवण्याचा कट? नेमकी कुठे घडली घटना?

विंग कमांडरविरोधात लैंगिक व मानसिक छळाचा आरोप

पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की वायूदलातील पीडित महिला अधिकाऱ्याने श्रीनगर एअरफोर्स स्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. तिने केलेल्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा दाखल केला आहे. महिला अधिकाऱ्याने विंग कमांडरविरोधात लैंगिक व मानसिक छळाचा आरोप केला आहे.दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तपास चालू केला आहे. आरोपी विंग कमांडरची याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे.