IAF Wing Commander Honey Trap: भारतीय हवाई दलाच्या (IAF) एका विंग कमांडरने सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती उघड केल्याबद्दल दोन महिन्यांपूर्वी त्याला अटक करण्यात आले होते. पोलिसांनी यासंबंधी आता माहिती दिली असून संबंधित अधिकाऱ्यावर गोपनीयतेच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आता तो न्यायालयीन कोठडीत आहे, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात देण्यात आली आहे.
हे प्रकरण फक्त एका अधिकाऱ्यापुरते मर्यादीत नसून यामागे एक मोठी गुप्तचर साखळी कार्यरत असल्याचा संशय दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला आहे. भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलाशी निगडित महत्त्वाची सामरिक माहिती फोडणे हा या साखळीचा उद्देश असू शकतो, असाही पोलिसांना संशय आहे.
पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांनी रचलेल्या ‘हनी ट्रॅप’ला विंग कमांडर बळी पडल्याचा दावा करण्यात येत आहे. अटकेत असलेल्या अधिकाऱ्याने एका सहकाऱ्याच्या मोबाइलचे नियंत्रण मिळवण्यासाठी त्यात डेटा चोरणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले होते. भारतीय हवाई दलाच्या गुप्तचर विभागाने या प्रकरणाशी संबंधित माहिती दिल्ली पोलिसांना पुरविल्यानंतर ३१ मे रोजी या विंग कमांडरला अटक करण्यात आली.
नेमके प्रकरण काय?
पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सदर विंग कमांडर गेल्या काही काळापासून वैयक्तिक आयुष्यातील अडचणींचा सामना करत होते. या काळात सोशल मीडियावर त्यांची एका महिलेशी ओळख झाली. हळूहळू त्यांच्यातील संवाद वाढू लागला. ते व्हिडीओ कॉलवरही बोलू लागले.
पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने विंग कमांडरचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याच्याकडून लष्करी तुकड्यांच्या हालचाली आणि त्यांना कुठे तैनात केले आहे, याचे फोटो, व्हिडीओ आणि माहिती शेअर करण्यास सांगितले. सदर महिला पाकिस्तानी हँडलर्सच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. संबंधित अधिकाऱ्याने कथितरित्या या महिलेला महत्त्वाची कागदपत्रे आणि डेटा पाठवल्याचा दावा केला जात आहे.
सहकाऱ्याच्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल केले सॉफ्टवेअर
सदर विंग कमांडरकडून महत्त्वाची माहिती मिळवल्यानंतर या महिलेने त्याच्या सहकाऱ्याच्या मोबाइलमध्ये विशिष्ट ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले. हे ॲप रिमोट ॲक्सेस मालवेअरचा एक प्रकार असून याद्वारे मोबाइलमधील डेटा चोरणे, लोकेशनचा शोध घेणे अशाप्रकारची चोरी केली जाते.
सदर अधिकाऱ्याकडून बाहेर गेलेली माहिती किती संवेदनशील होती आणि त्याचा वापर कोणत्या उद्देशासाठी केला जाऊ शकतो, याची माहिती आता तपास यंत्रणेकडून गोळा केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला संरक्षण दलातील जवानांना लक्ष्य करून गोपनीय माहिती मिळवण्यासाठी एका सुनियोजित हनी ट्रॅपचा भाग असावी. या महिलेशी झालेल्या डिजिटल संवादाचा आता शोध घेतला जात आहे.
विंग कमांडर न्यायालयीन कोठडीत
विंग कमांडरला मे महिन्यात अटक केल्यानंतर सुरुवातीला पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. त्यानंतर सध्या ते तिहाल तुरुंगातील न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाची तपास आता डिजिटल संवादावर आधारित आहे. विंग कमांडर आणि महिलेने कोणत्या माध्यमातून संवाद साधला, याचाही शोध घेतला जात आहे.
