उत्तर प्रदेश केडरच्या धडाडीच्या महिला सनदी अधिकारी (IAS) दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. प्रशासकीय सेवेतील १३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय प्रवासानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत त्यांनी या निर्णयाची माहिती दिली असून, या पोस्टमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
IIT दिल्ली आणि IIM बंगळुरू यांसारख्या देशातील नामांकित संस्थांमधून उच्च शिक्षण घेतल्यानंतर दिव्या मित्तल यांनी लंडनमध्ये लाखोंच्या पॅकेजची नोकरी केली होती. मात्र, मातृभूमीची सेवा करण्याची प्रबळ इच्छा असल्याने त्यांनी ती आलिशान नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. कठीण परिश्रम करून त्यांनी ‘UPSC’ परीक्षेत यश मिळवले आणि त्या ‘IAS’ अधिकारी बनल्या.
“लोकांना काहीतरी द्यायला आले होते, पण…”
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये स्वतःच्या भावना व्यक्त करताना दिव्या मित्तल यांनी लिहिले, “मी किती मूर्ख होते, जे विचार करायचे की मी या देशाला किंवा लोकांना काहीतरी द्यायला आले आहे. पण खरी गोष्ट ही आहे की, या १३ वर्षांत मलाच लोकांकडून सर्वाधिक प्रेम, सन्मान आणि आपुलकी मिळाली. लोकांचे हे ऋण माझ्यावर आयुष्यभर राहील.”
प्रशासकीय सेवेत काम करताना मिळालेल्या अनुभवांवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, “देवरिया जिल्ह्यातील सेवेने मला शिकवले की नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणे हा पर्याय नसून कर्तव्य आहे. मिर्झापूरने मला शिकवले की जगात ‘अशक्य’ असे काहीच नसते, तो फक्त लोकांचा एक दृष्टिकोन असतो. सरकारी कागदपत्रांच्या आणि फाईल्सच्या मागे एक जिवंत व्यक्ती आणि तिचे आयुष्य असते, हे मी जवळून पाहिले.”
राजीनामा देताना त्यांनी लहुरिया दह या दुर्गम भागातील एका घटनेची आठवण आवर्जून सांगितली. “गावात पहिल्यांदाच पिण्याचे पाणी पोहोचल्यानंतर एका वृद्ध माऊलीने थरथरत्या हातांनी माझ्या डोक्यावर ठेवलेला आशीर्वादाचा हात मी कधीही विसरू शकत नाही. आज माझे पद सुटले आहे, पण लोकांचा तो विश्वास आणि हा स्पर्श माझ्यासोबत आयुष्यभर राहील,” अशा अत्यंत भावूक शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
दिव्या मित्तल यांनी अचानक राजीनामा का दिला, यामागचे नेमके प्रशासकीय किंवा वैयक्तिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मिर्झापूर, देवरिया यांसारख्या भागांत आपल्या कामांमुळे नागरिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या या महिला अधिकाऱ्याच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
