दिव्या मित्तल सध्या देशभरात चांगल्याच चर्चेत आहेत. त्या उत्तर प्रदेशात जिल्हाधिकारी होत्या. तसेच भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांनी तब्बल १३ वर्षे काम केलेलं आहे. मात्र, ३० ऑगस्ट रोजी अचानक दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे दिव्या मित्तल या देशभरात चर्चेत आल्या आहेत. १३ वर्ष प्रशासकीय सेवेत काम केल्यानंतर अचानक मित्तल यांनी राजीनामा का दिला? राजीनामा देण्यामागचं कारण काय?याबाबत सोशल मीडियावर अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवरच आता दिव्या मित्तल यांनी स्वतः चं राजीनामा देण्यामागचं कारण सांगितलं आहे. भारतीय प्रशासकीय सेवेचा स्वेच्छेने राजीनामा दिल्यानंतर आता दिव्या मित्तल यांनी मौन सोडलं आहे. आपण राजीनामा देण्याचा निर्णय हा अत्यंत विचारपूर्वक घेतला असून कोणत्याही दबावाखाली किंवा एखाद्या अचानक घडलेल्या घटनेमुळे हा निर्णय आपण घेतलेला नाही, असं मित्तल यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
राजीनामा का दिला? दिव्या मित्तल यांचा खुलासा
“आपण राजीनामा देण्याचा निर्णय हा आपल्या प्राधान्यक्रम, आवडीनिवडी आणि कुटुंबाचा विचार करून घेतला आहे. आयएएसची नोकरी हा माझ्या आयुष्यातील केवळ एक अध्याय आहे, माझं संपूर्ण अस्तित्व नाही. तसेच आपण राजीनामा देण्याचा निर्णय हा घाईघाईने घेतलेला नाही. हे पाऊल उचलण्यापूर्वी आपण कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांचा विचार केला”, असं दिव्या मित्तल यांनी म्हटलं आहे.
“कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून मनातील काही जुन्या आवडीनिवडी आपण जोपासू इच्छित आहे. भविष्यात लेखन, अध्यापन किंवा समाजसेवा या सारख्या क्षेत्रांत काम करण्याचा विचार करत आहे. पण पुढे नक्की काय करायचं? याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. आयएएस अधिकारी ही आयुष्यातील एक महत्त्वाची बाब होती, पण तेच संपूर्ण आयुष्य नव्हतं”, असं दिव्या मित्तल यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना म्हटलं आहे.
सरकारी अधिकारी म्हणून १३ वर्षांपासून मित्तल होत्या कार्यरत
“आज मी स्वतःच्या इच्छेने IAS अधिकारी म्हणून राजीनामा देतं आहे. मी माझ्या १३ वर्षांच्या प्रवासातून पाऊल मागे घेतलं आहे”, असं दिव्या मित्तल यांनी राजीनामा देताना सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं होतं. २०१३ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या दिव्या मित्तल यांना २ सप्टेंबर २०१३ रोजी नियुक्त करण्यात आलं होतं. सुरुवातीला त्यांची नियुक्ती मेरठ या ठिकाणी झाली होती. त्यानंतर गोंडा, कानपूर, बरेली, संत कबीर नगर या ठिकाणी ही त्या कार्यरत होत्या. सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत मिर्झापूरच्या जिल्हाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. जुलै २०२४ पासून त्या देवरियाच्या जिल्हाधिकारी होत्या. मे महिन्यात त्यांनी लखनऊ या ठिकाणी महसूल विभागाच्या विशेष सचिव म्हणूनही त्या कार्यरत होत्या.
राजीनामा देताना दिव्या मित्तल यांची भावूक पोस्ट चर्चेत
“मी देवरियामध्ये होते. मला इथे शिकायला मिळालं की योग्य बाजूने उभं राहणं हा एखादा पर्याय नाही तर ते आपलं परम कर्तव्य आहे. माझं शिक्षण, आत्मविश्वास, जगात मान उंच करुन चालण्याचा आत्मविश्वास हे सगळं मला या नोकरीने दिलं. मी मूर्ख होते. मला वाटलं होतं की काहीतरी द्यायला आले आहे. पण वास्तव हे आहे की मी या नोकरीत खूप काही शिकले आहे. मोठा अनुभव घेऊन चालले आहे. आज ही सेवा सोडत असताना डोळ्यांत पाणी आहे. आजही माझ्यासमोर लहुरिया गावातल्या डोंगरात ती वृद्ध आई आहे जिने पहिल्यांदा पाणी गावात पोहचताना पाहिलं. तिने थरथरत्या हाताने माझ्या डोक्याला हात लावून आशीर्वाद दिला होता. आज माझं पद सुटलं, पण तो स्पर्श मी आज बरोबर घेऊन चालले आहे. माझ्या देशाच्या मातीने जे स्वप्न मला दिलं ते मी बरोबर नेत आहे”, अशी भावूक पोस्ट दिव्या मित्तल यांनी केली होती.
