IAS Divya Tanwar UPSC success story without coaching from a small village to LBSNA: जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे हरियाणाच्या दिव्या तंवर हिने सिद्ध करून दाखवले आहे. कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासशिवाय, केवळ ऑनलाइन संसाधने आणि स्वतःच्या मेहनतीवर दिव्याने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी यूपीएससी (UPSC) परीक्षेत दोनदा यश मिळवले. प्रथम आयपीएस (IPS) आणि त्यानंतर आयएएस (IAS) अधिकारी बनून तिने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
वडिलांचे छत्र हरपले, आईने सावरले कुटुंब
दिव्या तंवर हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील निंबी या छोट्या गावातून येते. २०११ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, तिची आई बबिता तंवर यांनी हार मानली नाही. त्यांनी शेतमजुरी करून आणि लोकांचे कपडे शिवून आपल्या तीन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. दिव्याने आपले प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेतून आणि माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालयातून पूर्ण केले. विज्ञान विषयात पदवी घेतल्यानंतर तिने प्रशासकीय सेवेत जाण्याचे आपले बालपणीचे स्वप्न उराशी बाळगून दिल्लीच्या दिशेने न वळता घरातूनच अभ्यासाला सुरुवात केली.
कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात ‘आयपीएस’
अनेक उमेदवार यूपीएससीच्या तयारीसाठी लाखो रुपये खर्च करून कोचिंग क्लासेस लावतात. मात्र, दिव्याने एक वेगळी वाट निवडली. तिने इंटरनेटवरील उपलब्ध मोफत संसाधने, ऑनलाइन लेक्चर्स आणि मॉक टेस्टचा वापर करून अभ्यासाचे नियोजन केले. तिची ही शिस्तबद्ध तयारी २०२१ मध्ये फळली. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी तिने पहिल्याच प्रयत्नात अखिल भारतीय रँक (AIR) ४३८ मिळवली. या यशामुळे ती देशातील सर्वात तरुण आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक ठरली.
स्वप्न अजून बाकी होते; दुसऱ्या प्रयत्नात ‘आयएएस’ची भरारी
आयपीएस पद मिळूनही दिव्या समाधानी नव्हती. तिचे मूळ ध्येय आयएएस अधिकारी होण्याचे होते. पहिल्या यशानंतरही तिने आपला सराव सुरू ठेवला. २०२२ मध्ये तिने पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी तिने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत १०५ वी रँक पटकावली. तिच्या या कामगिरीमुळे तिचे आयएएस बनण्याचे दीर्घकालीन स्वप्न सत्यात उतरले. पहिल्या प्रयत्नात एकूण ९३० गुण मिळवणाऱ्या दिव्याने दुसऱ्या प्रयत्नात तब्बल ९९४ गुण मिळवून आपल्या प्रगतीचा आलेख उंचावला.
तरुणाईसाठी प्रेरणादायी प्रवास
दिव्या सध्या मणिपूर कॅडरमध्ये सेवा बजावत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) श्रेणीतून असूनही तिने आपली गरिबी कधीच ध्येयाच्या आड येऊ दिली नाही. “जर तुमच्याकडे स्पष्ट ध्येय आणि ते साध्य करण्याची जिद्द असेल, तर संसाधनांची कमतरता तुम्हाला रोखू शकत नाही,” असा संदेश तिच्या या प्रवासातून मिळतो. आज दिव्या तंवरचा हा संघर्षमय प्रवास सोशल मीडियावर लाखो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे.
