IAS Gyanendra Kumar Gangwar : कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार हे दोन दिवसांपूर्वी विमानतळावरून अचानक बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले होते. याबाबतची माहिती खुद्द कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून दिली होती. या घटनेमुळे कर्नाटकच्या प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेच्या दोन दिवसानंतर म्हणजे आज (२२ ऑगस्ट) अखेर बेपत्ता झालेल्या आयएएस अधिकाऱ्याबाबत गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी ट्विट करत मोठी माहिती दिली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

कर्नाटक केडरचे २०१६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार हे दोन दिवसांपासून म्हणजे २० ऑगस्टपासून अचानक बेपत्ता झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता. तसेच त्यांचा फोन देखील बंद होता. त्यामुळे कर्नाटकच्या प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.

यानंतर याबाबत कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत ज्ञानेंद्र कुमार गंगवार हे बेपत्ता झाल्याच्या घटनेसंदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. या संदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे.

वृत्तानुसार, आयएएस अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार हे २० ऑगस्ट रोजी सकाळी बंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. त्यांचं शेवटचं लोकेशन तेथील होतं. मात्र, त्यानंतर ते अचानक गायब झाले. त्यांचा फोनही बंद येत होता. त्यामुळे ते नेमकं कुठे गेले? याबाबत मोठी चर्चा सुरू झाली होती. त्यांचा शोध घेण्याचं कामही सुरू करण्यात आलं होतं. मात्र, आयएएस अधिकारी अचानक बेपत्ता झाल्याच्या घटनेमुळे राज्यभरात हा चर्चेचा विषय ठरला.

गृहमंत्री खर्गेंनी काय म्हटलं होतं?

बेपत्ता झालेल्या आयएएस अधिकाऱ्याबाबत माहिती देताना एका निवेदनात खर्गे यांनी सांगितलं होतं की, अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार हे बेपत्ता झाल्याच्या घटनेबाबत सरकारला दोन दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती. आतापर्यंत या अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांकडून किंवा इतर कोणाकडूनही कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तसेच सरकारचा त्यांच्याशी असलेला सर्व प्रकारचा संपर्क तुटला आहे. मात्र, त्यांचा शोध घेतला जात आहे, असं खर्गे यांनी सांगितलं होतं.

तसेच संबंधित अधिकारी हे बंगळुरू विमानतळावर शेवटचे दिसले होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यांच्याबाबत सध्या आमच्याकडे अशी माहिती आहे की, त्यांचा शोध घेताना ते शेवटचे बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर असल्याचे आढळले होते. आम्हाला विमानतळावरून काही माहिती मिळाली असून आम्ही त्याची पडताळणी करत आहोत. प्रशासन अद्याप त्यांचा तपास करत आहे, असं गृहमंत्री खर्गे यांनी म्हटलं होतं.

गृहमंत्री खर्गेंनी अखेर काय खुलासा केला?

दरम्यान, बंगळुरू विमानतळावरून अचानक ज्ञानेंद्र कुमार गंगवार हे बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले होते. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. संबंधित अधिकाऱ्याने नंतर सरकारशी संपर्क साधला असून त्यांनी कौटुंबिक कारणास्तव आणि काही इमर्जन्सी परिस्थितीमुळे रजा घेतली होती आणि ते आपल्या मूळ गावी गेले होते. या काळात ते त्यांच्या दूरध्वनी क्रमांकावर उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांच्या ठिकाणाबाबत गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी सरकारशी संपर्क साधला आणि वस्तुस्थिती सांगितली आहे, असा खुलासा आज (२२ ऑगस्ट) गृहमंत्री खर्गे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केला आहे.