IAS Himanshu Gupta Success Story: ‘इच्छा तिथे मार्ग’ आणि ‘कठोर परिश्रमाला पर्यायी नाही’ या म्हणी सार्थ करून दाखवल्या आहेत आयएएस अधिकारी हिमांशू गुप्ता यांनी. उत्तराखंडच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या हिमांशू यांनी गरिबी, तुटपुंजी साधने आणि सामाजिक टिंगल-टवाळीवर मात करत थेट देशातील सर्वोच्च नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यांचा हा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

चहाच्या टपरीवरून सुरू झाला प्रवास

हिमांशू यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे वडील रोजंदारीवर काम करायचे आणि घर चालवण्यासाठी चहाची टपरी चालवायचे. हिमांशू स्वतः शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतर वडिलांना टपरीवर मदत करायचे. संपूर्ण कुटुंब मिळून दिवसाला अवघ्या ४०० रुपयांची कमाई करत असे.

“माझे वर्गमित्र जेव्हा चहाच्या टपरीवरून जायचे, तेव्हा मी सुरुवातीला लपायचो. एकदा एका मित्राने मला पाहिले आणि माझी ‘चायवाला’ म्हणून चेष्टा केली. पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले,” अशा शब्दांत हिमांशू यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

शिक्षणासाठी रोज ७० किलोमीटरचा खडतर प्रवास

हिमांशू यांची शाळा घरापासून ३५ किलोमीटर दूर होती. दररोज येण्या-जाण्यासाठी त्यांना व्हॅनने ७० किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा. परिस्थिती बेताची असूनही त्यांच्या आई-वडिलांनी शिक्षणात कधीही तडजोड केली नाही. स्वतःचे शिक्षण अपूर्ण राहिलेल्या वडिलांनी हिमांशूला नेहमी सांगितले की, “स्वप्ने पूर्ण करायची असतील तर अभ्यास कर!”

इंग्रजीचे आव्हान आणि जिद्द

मोठ्या शहरात राहण्याचे आणि कुटुंबाचे आयुष्य बदलण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हिमांशू समोर इंग्रजी भाषेचे मोठे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यासाठी त्यांनी चक्क इंग्रजी चित्रपटांच्या डीव्हीडी विकत घेतल्या आणि त्या पाहून स्वतःचे इंग्रजी सुधारले. प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळवण्याच्या ध्येयाने ते झपाटून कामाला लागले होते.

यशाची हॅट्ट्रिक: IRTS, IPS आणि शेवटी IAS

हिमांशू गुप्ता यांनी केवळ एकदाच नाही, तर सलग तीन वेळा यूपीएससी परीक्षेत यश मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली:

२०१९: पहिल्या प्रयत्नात भारतीय रेल्वे वाहतूक सेवेसाठी (IRTS) निवड.

२०१९: दुसऱ्या प्रयत्नात भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) निवड.

२०२०: तिसऱ्या प्रयत्नात अखेर आपले मुख्य स्वप्न पूर्ण करत भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) झेप.

एक प्रेरणादायी यशोगाथा

आज हिमांशू गुप्ता हे त्या सर्व उमेदवारांसाठी आशेचा किरण आहेत जे आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडण्याचा विचार करतात. वडिलांच्या कष्टाची जाण आणि स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर एक सामान्य ‘चायवाला’ देशाचा ‘प्रशासक’ बनू शकतो, हे हिमांशू यांनी जगाला दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण उत्तराखंडमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.