IAS Neha Byadwal Inspiring Journey: यूपीएससी परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेत अनेकदा अपयश आल्यावर उमेदवार खचून जातात आणि प्रयत्न सोडून देतात. पण आयएएस अधिकारी नेहा ब्याडवाल यांची गोष्ट याला अपवाद ठरते. इयत्ता पाचवीत नापास होण्यापासून ते सलग ३ वेळा यूपीएससीत आलेल्या अपयशावर मात करत त्यांनी चौथ्या प्रयत्नात आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले.

दरवर्षी लाखो तरुण अतिशय अवघड आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. अनेकदा अपयश पदरी आल्यावर बहुसंख्य उमेदवार हा मार्ग सोडून देतात. मात्र आयएएस अधिकारी नेहा ब्याडवाल यांनी हार मानण्याऐवजी संघर्षाचा मार्ग निवडला. २०२१ च्या यूपीएससी परीक्षेत चौथ्या प्रयत्नात त्यांनी संपूर्ण भारतातून ५६९ वा क्रमांक मिळवला आणि वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्या आयएएस अधिकारी बनल्या. त्यांचा हा प्रवास अपयशाने खचून जाणाऱ्या प्रत्येकासाठी एक उत्तम उदाहरण आहे.

पाचवीत नापास

मूळच्या राजस्थानच्या जयपूर येथील असलेल्या नेहा यांचे बालपण वेगवेगळ्या शहरांमध्ये गेले. त्यांचे वडील प्राप्तिकर विभागात नोकरीला असल्यामुळे त्यांची सतत बदली होत असे. जयपूर, भोपाळ, बिलासपूर, कोरबा आणि रायपूर अशा विविध शहरांमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. सतत शाळा आणि शहर बदलल्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावरही झाला. एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर भाषेच्या अडचणीमुळे त्या चक्क पाचवीत नापास झाल्या. मात्र, जुन्या शाळेत परत जाण्याऐवजी त्यांनी कठोर परिश्रम घेऊन हे आव्हान पेलण्याचा आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याचा निर्णय घेतला.

विद्यापीठात प्रथम ते यूपीएससीचा प्रवास

पाचवीतील त्या अपयशानंतर नेहा यांनी आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवला आणि अभ्यासात लक्ष केंद्रित केले. पुढे त्यांनी पदवीच्या परीक्षेत विद्यापीठात पहिला क्रमांक पटकावला. सातत्यपूर्ण प्रयत्नांनी सुरुवातीच्या अपयशावर मात करता येते, हा त्यांचा विश्वास या यशामुळे अधिक दृढ झाला. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे त्यांनी यूपीएससी तयारी करण्याचा निर्णय घेतला.

सलग तीन अपयश, पण…

नेहा यांचा सोपा नव्हता. पहिल्या दोन प्रयत्नांत नेहा यांना पूर्व परीक्षाही उत्तीर्ण करता आली नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी पूर्व परीक्षा पास केली, पण मुख्य परीक्षेत त्यांना अपयश आले. अनेक उमेदवार अशा परिस्थितीत खचून जातात आणि तयारी सोडून देतात, पण नेहा यांनी प्रत्येक अपयशाला स्वीकारले आणि स्वतःच्या चुकांवर काम केले. या कठीण काळात कुटुंबाने दिलेल्या खंबीर साथीमुळे आपला आत्मविश्वास टिकून राहिला, असे त्या आवर्जून सांगतात.

चौथ्या प्रयत्नात मिळवले घवघवीत यश

अखेर त्यांच्या चिकाटीला फळ मिळाले. २०२१ च्या यूपीएससी परीक्षेत चौथ्या प्रयत्नात त्यांनी घवघवीत यश मिळवत ५६९ वी रँक मिळवली आणि वयाच्या २४ व्या वर्षी त्या गुजरात कॅडरच्या आयएएस अधिकारी बनल्या.

सध्या उत्तर प्रदेशातील हरदोई येथे मुख्य विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या नेहा ब्याडवाल यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अत्यंत मोलाचा सल्ला देतात. त्यांच्या मते, “तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा त्या वेळेचा किती प्रभावीपणे वापर करता हे जास्त महत्त्वाचे आहे. केवळ तासनतास पुस्तकांत डोके खुपसून बसण्यापेक्षा शिस्तबद्ध नियोजन, नियमित उजळणी, उत्तर लेखनाचा सराव आणि सातत्य या गोष्टी यशासाठी अधिक महत्त्वाच्या आहेत.”