IAS Officer Pradeep Kumar Arrested in Haryana by CBI: आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेत ठेवलेल्या हरियाणा सरकारच्या आठ विभागांच्या ५०४ कोटी रुपयांच्या मुदत ठेवींचा कथित घोटाळा काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या कथित गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयने आयएएस अधिकारी प्रदीप कुमार यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी अटक केली आहे. त्यांच्यासह दोन माजी बँक अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. प्रदीप कुमार हरियाणा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (HSPCB) माजी सदस्य सचिव होते. मुदत ठेवी करण्याच्या नावाखाली त्यांनी सरकारचा १६९ कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित केला होता, असा आरोप त्यांच्यावर आहे.
सीबीआयच्या तपासात अनेक धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. या घोटाळ्यामुळे हरियाणा सरकारच्या विभागाला मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना करावा लागला. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप कुमार हे स्वतः गुंतवणुकीशी संबंधित काम पाहत होते. त्यांनी चंदीगडमधील सेक्टर ३२ मधील आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शाखेत मर्यादेपेक्षा अधिकची रक्कम वळवली होती.
निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी अटक
प्रदीप कुमार यांच्या सेवेचा शेवटचा दिवस असतानाच सीबीआयने त्यांना अटक केली. प्रदीप कुमार हे २०११ च्या बॅचचे हरियाणा नागरी सेवेचे अधिकारी आहेत. कालांतराने त्यांना आयएएस पदावर बढती देण्यात आली. हरियाणा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निधीच्या अपहारात त्यांचा सदस्य सचिव म्हणून थेट सहभाग होता.
सीबीआयच्या चौकशीत निष्पन्न झाले की, HSPCB नावाने बँक खाते उघडले होते. मात्र खाते उघडण्यापूर्वी सरकारी विभागाची परवानगी घेतलेली नव्हती. तसेच पैसे वळते केल्यानंतर त्याची मुदत ठेव करण्यात आली नाही. मुदत ठेवऐवजी या रकमेचे व्यवहार करण्यात आले. ज्यामुळे सरकारी निधीचा गैरव्यवहार करण्यात आला.
सीबीआयने पुढे म्हटले की, प्रदीप कुमार यांना चौकशीसाठी वारंवार समन्स बजावूनदेखील ते चौकशीसाठी उपस्थित राहत नव्हते. तसेच त्यांनी पंचकुला न्यायालयात अंतरिम जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. २ जुलै रोजी त्यावर सुनावणी होणार होती.
प्रदीप कुमार यांचा ठावठिकाणा मिळाल्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली. हरियाणा सरकारच्या आठ विभागांचा मिळून ५०४ कोटी रुपयांच्या निधीचा अपहार करण्यात आला आहे. या घोटाळ्यात HSPCB मंडळात झालेल्या १६९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचाही समावेश आहे. सरकारी विभागाचा निधी बँक खात्यात वळता करून त्यात गैरव्यवहार करण्यात आला.
१७ जणांवर आरोपपत्र दाखल
सीबीआयने या गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत १७ लोकांविरोधात आरोप दाखल केले आहेत. यापैकी सह आरोपी आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेचे अधिकारी आहेत. हरियाणा सरकारमधील तीन जण आहेत. तसेच दोन कंपन्या आणि सहा इतर लोकांनाही घोटाळ्या प्रकरणी अटक केली आहे.
प्रदीप कुमार यांना ताब्यात घेण्यापूर्वी हरियाणा सरकारमधील दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांची अटक करण्यात आली होती.
