IAS Vandana Vaidya Gambling Raid: मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील आयएएस अधिकारी वंदना वैद्य आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या असलेल्या फार्महाऊसवर पोलिसांनी धाड टाकली. याठिकाणी जुगार खेळणाऱ्या तब्बल १८ लोकांना ताब्यात घेण्यात आले. वंदना वैद्य मध्य प्रदेश सरकारच्या वित्त विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत आहेत. या घटनेनंतर त्यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

इंदूर जिल्हा मुख्यालयापासून ५० किमी अंतरावर असलेल्या अवलीपुरा गावातील एका फार्महाऊसवर पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी सांगितले की, १८ जण जुगार खेळताना आढळले. तर सहा जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे.

या धाडीदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ३० मोबाइल फोन, पत्ते आणि १३.६८ लाख रुपये जप्त केले. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा फार्महाऊसचा मुख्य दरवाजा बंद होता. तरीही हे लोक आत प्रवेश करून जुगार खेळत होते. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या आणि जुगार कायद्यातील विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला.

आयएएस वंदना वैद्य काय म्हणाल्या?

या कारवाईनंतर अधिकारी वंदना वैद्य यांनी पोलिसांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले की, काही अज्ञात लोक आमच्या फार्महाऊसमध्ये बेकायदेशीरपणे घुसले आणि तिथे त्यांनी अवैध काम केले. तसेच या लोकांनी फार्महाऊसमध्ये चोरीही केली असावी, असा संशय त्यांनी पत्रातून व्यक्त केला. आरोपींविरोधात स्वतंत्र फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंतीही त्यांनी पोलिसांना केली.

upsc shikha gautam story
आयएएस झाल्याच्या आनंदात मिरवणूक काढली, मुलाखती दिल्या, पण नंतर समोर आले धक्कादायक सत्य.

पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांगचेन डोलकर भुतिया यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटले की, आयएएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी केली जाईल. तसेच आरोपींनी फार्महाऊसमध्ये कसा प्रवेश केला, याचाही तपास केला जाईल. या घटनेनंतर मानपूर पोलीस ठाण्याचे अंमलदार, पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे.