Who is Padma Jaiswal? : देशभरातील अनेक शहरांत सातत्याने लाचखोरीचे प्रकरणं समोर येत असल्याचं पाहायला मिळतं. यावर संबंधित यंत्रणांकडून कारवाई करत संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन देखील केलं जातं. मात्र, त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती ‘जैसे थे’ म्हणजे जशीच्या तशी होते. मात्र, आता भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एका आयएएस अधिकाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

केंद्र सरकारने २००३ च्या बॅचच्या एजीएमयूटी (AGMUT: अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम-केंद्रशासित प्रदेश) केडरच्या आयएएस अधिकारी पद्मा जयस्वाल यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवरून सेवेतून थेट बडतर्फ केलं असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभागात विशेष सचिव असलेल्या पद्मा जयस्वाल यांना एका शिस्तभंगाच्या प्रक्रियेनंतर बडतर्फ करण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

वृत्तानुसार, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या (DoPT) शिफारशीनुसार भारताच्या राष्ट्रपतींच्या अंतिम मंजुरीनंतर या आठवड्याच्या सुरुवातीला आयएएस अधिकारी पद्मा जयस्वाल यांच्या बडतर्फीचा आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच एजीएमयूटी (AGMUT) केडरच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत काही गंभीर आरोप झाल्यास गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार डीओपीटी विभागाकडून असा निर्णय घेतला जाऊ शकतो.

पद्मा जयस्वाल यांनी काय प्रतिक्रिया दिली?

दरम्यान, एजीएमयूटी केडरच्या अधिकारी पद्मा जयस्वाल यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आल्यानंतर त्यांनी अगदी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “अशा कोणत्याही घडामोडीची किंवा बडतर्फीचा आदेश पारित झाल्याची मला माहिती नाही,” असं वृत्तात म्हटलं आहे.

पद्मा जयस्वाल यांच्यावरील कारवाईचं कारण काय?

आयएएस अधिकारी पद्मा जयस्वाल यांच्यावर झालेल्या बडतर्फीच्या कारवाईचं कारण हे २००७-०८ मध्ये त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या आरोपांच्या प्रकरणात आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जेव्हा जयस्वाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, तेव्हा त्या अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्याच्या उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यावेळी फेब्रुवारी २००८ मध्ये काही स्थानिक रहिवाशांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांच्यावर शासकीय महसुलामध्ये अपहार केल्याचा आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.

एप्रिल २००८ मध्ये आयएएस अधिकारी पद्मा जयस्वाल यांना निलंबित देखील करण्यात आलं होतं. मात्र, पुढे ऑक्टोबर २०१० मध्ये त्यांचं निलंबन रद्द करण्यात आलं होतं. तेव्हा निलंबन रद्द करण्यात आलं असलं तरी गृह मंत्रालयाने अखिल भारतीय सेवेच्या नियमांच्या नियम ८ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू केली होती. २००९ आणि २०१० मध्ये पद्मा जयस्वाल यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती.

त्यानंतर केंद्रीय दक्षता आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यांनी एकत्र चर्चा करत पद्मा जयस्वाल यांना सेवेतून काढून टाकण्याची शिफारस केली होती. मात्र, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) यापूर्वी गृह मंत्रालयाने सुरू केलेली कार्यवाही रद्द करण्याचा निर्णय दिला होता. कारण कॅटच्या मते एजीएमयूटी (AGMUT) संवर्गातील अधिकाऱ्यांवर गृह मंत्रालयाचं अधिकारक्षेत्र नव्हतं.

IAS Padma Jaiswal Dismissed

दरम्यान, कॅटच्या निर्णयाला केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर यावर्षी १ एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयात केंद्राच्या बाजूने निकाल आला. या प्रकरणावर उच्च न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं की, कॅटने आपल्या निष्कर्षात ‘चूक’ केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर गृह मंत्रालयाने पद्मा जयस्वाल यांच्यावरील कारवाईची प्रक्रिया पूर्ण केली आणि बडतर्फीची शिफारस केली.

दरम्यान, दोन दशकांहून अधिकच्या कारकि‍र्दीत पद्मा जयस्वाल यांनी अरुणाचल प्रदेश, दिल्ली, गोवा आणि पुदुचेरी अशा विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे. मात्र, आयएएस अधिकाऱ्यांवर बडतर्फी किंवा सक्तीची सेवानिवृत्ती यांसारखी कारवाई क्वचितच केली जात असल्याने आता जयस्वाल यांच्यावरील कारवाईमुळे प्रशासकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

IAS Padma Jaiswal Dismissed

Who is Padma Jaiswal? पद्मा जयस्वाल कोण आहेत?

पद्मा जयस्वाल याचा जन्म ६ ऑक्टोबर १९७५ रोजी झाला आहे. पद्मा जयस्वाल या एजीएमयूटी केडरच्या २००३ च्या बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी आहेत. त्यांनी अकाउंटन्सीमध्ये बीकॉम, मॅनेजमेंटमध्ये एमकॉम आणि कंपनी मॅनेजमेंटमध्ये सीएस (CS) या पदव्या मिळवल्या आहेत. पद्मा जयस्वाल यांनी १६ फेब्रुवारी २०२६ पासून दिल्लीत प्रशासकीय सुधारणा विभागात विशेष सचिव म्हणून काम केलेलं आहे. आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी सचिव, संचालक, उपायुक्त, सहसचिव आणि रजिस्ट्रार यांसारखी विविध पदे भूषवलेली आहेत. सेवेतून काढून टाकल्यामुळे त्यांचा सध्याचा आयएएस कार्यकाळ संपला आहे.

दरम्यान, पद्मा जयस्वाल यांनी भारत सरकारच्या प्रशासकीय सेवेत जवळपास २३ वर्ष काम केलं आहे. मात्र, तब्बल २३ वर्ष आयएएस अधिकारी म्हणून सेवा केल्यानंतर एका प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर जयस्वाल यांना बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई २००७-०८ मध्ये त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या संदर्भात असली तरी आरोप २००७-०८ मध्ये झाले आणि कारवाई थेट २०२६ मध्ये करण्यात आल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.