UPSC Success Story of IAS Pallavi Mishra: देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या यूपीएससीमध्ये यश मिळवण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता नाही, तर प्रबळ इच्छाशक्तीचीही गरज असते. हेच सिद्ध करून दाखवलंय भोपाळच्या पल्लवी मिश्रा यांनी. कायद्याची पदवी आणि शास्त्रीय संगीतात मास्टर्स केल्यानंतर, त्यांनी कोणत्याही महागड्या कोचिंगचा आधार न घेता ऑल इंडिया ७३ वा रँक पटकावून आयएएस (IAS) होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
संगीतापासून प्रशासनापर्यंतचा प्रवास
पल्लवी मिश्रा यांचे प्राथमिक शिक्षण भोपाळमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या ‘नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी’मधून कायद्याची पदवी संपादन केली. विशेष म्हणजे, शिक्षणासोबतच त्यांनी आपली शास्त्रीय संगीताची आवडही जोपासली. त्यांनी संगीतात मास्टर्स पूर्ण केले असून पंडित सिद्धराम स्वामी कोरवर यांच्याकडून संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. मात्र, केवळ छंद जोपासणे हे त्यांचे ध्येय नव्हते, तर लोकसेवेच्या माध्यमातून देशाची सेवा करणे हे त्यांचे स्वप्न होते.
पहिल्या प्रयत्नातील अपयश आणि पुनरागमन
पल्लवी यांनी जेव्हा पहिला प्रयत्न केला, तेव्हा त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, खचून न जाता त्यांनी आपल्या उणिवा शोधल्या. त्यांनी विशेषतः ‘निबंध लेखना’वर लक्ष केंद्रित केले आणि सातत्याने सराव केला. स्वतःच्या नोट्स स्वतः काढणे आणि अभ्यासात सातत्य ठेवणे यावर त्यांनी भर दिला. परिणामी, २०२२ च्या निकालात त्यांनी ७३ व्या रँकसह अभूतपूर्व यश मिळवले.
कुटुंबाची साथ आणि आयपीएस भावाची प्रेरणा
पल्लवी यांच्या यशात त्यांच्या कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे वडील अजय मिश्रा हे वरिष्ठ वकील आहेत, तर आई डॉ. रेनू मिश्रा वैज्ञानिक आहेत. त्यांचे मोठे भाऊ आदित्य मिश्रा हे आधीच आयपीएस (IPS) अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. भावाचा अनुभव आणि पालकांचा पाठिंबा यामुळे पल्लवी यांना कठीण काळातून सावरण्यास मोठी मदत झाली.
सध्याची जबाबदारी आणि सोशल मीडिया
पल्लवी मिश्रा या जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू जिल्ह्यातील मारह भागात उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) म्हणून कार्यरत आहेत. त्या पर्यावरण संरक्षण, महिला शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या सामाजिक विषयांवर काम करण्यास उत्सुक आहेत. कामासोबतच त्या सोशल मीडियावरही सक्रिय असतात.
