UPSC Success Story of IAS Srishti Dabas: जिद्द, चिकाटी आणि नियोजनाच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात, हे दिल्लीच्या सृष्टी डबास हिने सिद्ध करून दाखवले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२३ च्या परीक्षेत सृष्टीने कोणत्याही कोचिंगशिवाय, पहिल्याच प्रयत्नात थेट अखिल भारतीय स्तरावर ६ वा क्रमांक (AIR 6) पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.

नोकरी सांभाळून गाठले ध्येय

सृष्टीचे हे यश विशेष ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे, तिने हे यश नोकरी करत असताना मिळवले. परीक्षेच्या तयारीदरम्यान ती मुंबईत ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’मध्ये कार्यरत होती. दिवसा नोकरीच्या जबाबदाऱ्या पार पाडून रात्री आणि सुटीच्या वेळी तिने अभ्यासाचे सातत्य राखले. नोकरीसोबत मोठी स्वप्ने पाहता येतात आणि ती पूर्णही करता येतात, हे तिने आपल्या कृतीतून दाखवून दिले.

कोचिंगला दिला फाटा, ‘सेल्फ स्टडी’वर भर

आजच्या काळात यूपीएससीसाठी लाखो रुपये खर्चून कोचिंग घेण्याचे फॅड असताना, सृष्टीने मात्र स्व-अभ्यासावर (Self-study) विश्वास ठेवला. तिने पदव्युत्तर शिक्षणासाठी निवडलेल्या ‘राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध’ (PSIR) या विषयाचीच निवड मुख्य परीक्षेसाठी केली होती. मुलाखतीसाठी तिने विशेष तयारी करताना दररोज चार वर्तमानपत्रांचे वाचन आणि विविध पुस्तकांचा आधार घेतला.

शैक्षणिक पार्श्वभूमी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व

  • जन्म: १३ ऑक्टोबर १९९८ (दिल्ली).
  • शालेय शिक्षण: गंगा इंटरनॅशनल स्कूल (१२ वी मध्ये ९६.३३% गुण).
  • पदवी: इंद्रप्रस्थ कॉलेज (बीए – राज्यशास्त्र).
  • पदव्युत्तर शिक्षण: इग्नू (IGNOU) मधून राज्यशास्त्रात एम.ए.
  • कला: सृष्टी एक उत्तम कथ्थक नृत्यांगना देखील आहे. प्रशासकीय सेवेत असतानाही आपली नृत्याची आवड जोपासण्याचा तिचा मानस आहे.

यशाचे गमक आणि प्रेरणा

सृष्टीच्या मते, सातत्यपूर्ण अभ्यास, स्वतःवरचा विश्वास आणि योग्य नियोजन ही तिच्या यशाची त्रिसूत्री आहे. तिच्या या प्रवासात कुटुंबाचा, विशेषतः तिच्या आईचा खंबीर पाठिंबा होता. ग्रामीण भागातील किंवा ज्यांना महागड्या शहरात जाऊन कोचिंग घेणे परवडत नाही, अशा हजारो विद्यार्थ्यांसाठी सृष्टीचा हा प्रवास एक दीपस्तंभ ठरला आहे.