भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोमवारी झी एंटरटेनमेंट इंटरप्राइजेज लिमिटेडला नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये १५ जानेवारी रोजी प्रसारित झालेल्या रिअॅलिटी शोच्या प्रसारणाबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. या शोमध्ये दोन मुलांनी नोटाबंदीवर विडंबन केले होते. यासोबतच ही मुले पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पोशाखाची खिल्ली उडवतानाही दिसली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झी तामिळवर प्रसारित होणाऱ्या ‘ज्युनियर सुपर स्टार्स सीझन ४’ या रिअॅलिटी टेलिव्हिजन शोच्या एका भागावर भाजपाने चिंता व्यक्त केल्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आली आहे. दोन बाल स्पर्धकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कथितपणे खिल्ली उडवणारे स्किट सादर केल्याचा आरोप आहे. हे स्किट १५ जानेवारी रोजी प्रसारित करण्यात आले होते आणि एपिसोडमध्ये, लोकप्रिय तमिळ ऐतिहासिक राजकीय व्यंगचित्र इमसाय अरसन २३ पुलिकेसी मधील राजा आणि मंत्री म्हणून वेषभूषा केलेली दोन मुले सिंधिया नावाच्या देशाच्या राज्यकर्त्याची चेष्टा करताना दिसले.

तामिळनाडूमधील भाजपच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष सीटीआर निर्मल कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई करत मंत्रालयाने मीडिया हाऊसला सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. शोच्या कंटेंटचे हिंदीसह इतर भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मीडिया हाऊसला नोटीसवर सात दिवसांत उत्तर देण्यासाठी वेळ दिला आहे. पंतप्रधानांविरुद्ध आक्षेपार्ह कार्यक्रम प्रसारित केल्याबद्दल त्यांना सात दिवसांत उत्तर द्यावे लागेल, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. तसे न केल्यास पुढील कारवाई केली जाईल.

निर्मल कुमार यांनी आपल्या तक्रारीत, कार्यक्रमादरम्यान मुले जाणूनबुजून पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत होते. शोमध्ये नोटाबंदी, पंतप्रधानांच्या विविध देशांचे राजनैतिक दौरे आणि पंतप्रधानांच्या पोशाखाबद्दल निंदनीय टिप्पणी करण्यात आल्याचे निर्मल कुमार यांनी म्हटले.

या प्रकरणी निर्मल म्हणाले, ‘झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे ​​मुख्य क्लस्टर ऑफिसर सिजू प्रभाकरन यांनी मला सांगितले आहे की ते कार्यक्रमाशी संबंधित सर्व प्रकारचा भाग काढून टाकतील आणि लवकरच स्पष्टीकरण देतील. दुसरीकडे प्रभाकरन म्हणाले की त्यांची कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स टीम या समस्येकडे लक्ष देत आहे. तसेच प्रभाकरन यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ib ministry notice zee tamil for airing content mocking pm modi abn
First published on: 18-01-2022 at 13:34 IST