आयबीएमने सॉफ्टवेअर विभागातल्या ३०० कर्मचाऱ्यांना हाकलले!

कंपनीने स्वतः सध्या नव्या तंत्रज्ञानाची क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

आयबीएमने त्यांच्या सेवा विभागातील सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. यासाठी स्वत:चा पुनर्विकास तसेच ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार पारंपारिक सेवा कमी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. काढून टाकलेले बहुतेक कर्मचारी हे सॉफ्टवेअर सेवांशी निगडीत आहेत.

कंपनी सध्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित सेवांची क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करीत असून पारंपारिक सेवा कमी करण्यास प्राधान्य देत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

आयबीएमच्या विकासाविषयी बोलताना आयबीएमच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आमच्या व्यवसायाच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि नवीन उच्च मुल्यवर्धीत सेवांना प्राधान्य देण्यासाठी आयबीएमने स्वतःचा पुनर्विकास करण्याचे धोरण आखले आहे. भारताच्या तंत्रज्ञान विकासात एक महत्वाचा भाग राहण्यासाठी आयबीएम वचनबद्ध आहे.”

आयबीएमच्या भारतातील कार्यालयांमध्ये कौशल्य संचांचे पुनर्मुल्यांकन झाले आहे. कंपनी क्लाऊड, आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रात प्रतिभा वाढविण्याच्या प्रयत्नात आहे, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कर्मचाऱी पुन्हा कौशल्य प्राप्त करीत असल्याचेही कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ibm sacks 300 employees from services division