IC 814 Hijack Kandahar Doctor Tried to Convert Passengers to Islam : अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आय सी ८१४ : कंदहार हायजॅक’ ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यापासून देशभर चर्चेत आहे. या सीरिजमधील दहशतवादी पात्रांच्या नावावरून मोठा गोंधळ चालू असतानाच आता अपहृत प्रवाशांनी अपहरणकर्त्यांबद्दल केलेली वक्तव्ये देखील चर्चेत आहेत. या सीरिजमुळे भारतीयांच्या मनावर झालेली जुनी जखम पुन्हा एकदा ताजी झाली आहे. २४ डिसेंबर १९९९ रोजी इंडियन एअरलाईन्सच्या एका विमानाने नेपाळची राजधानी काठमांडूहून दिल्लीसाठी उड्डाण केलं. मात्र या विमानात पाच दहशतवादी शस्त्र व दारुगोळा घेऊन बसले होते. विमानाच्या उड्डाणानंतर ४० मिनिटांनी त्यांनी विमान ताब्यात घेतलं. हे पाचही दहशतवादी विमान घेऊन अमृतसर, लाहोर, दुबई असा प्रवास करून तालिबान नियंत्रित अफगाणिस्तानमधील कंदहार शहरात नेलं. अपहरणकर्त्यांनी विमानातील प्रवासी व क्रू सदस्यांना आठ दिवस ओलिस ठेवलं होतं. तसेच भारत सरकारशी वाटाघाटी करून विमानातील प्रवाशांना मुक्त करण्याच्या बदल्यात त्यांनी भारताच्या ताब्यात असलेले दहशतवादी मसूद अझहर, ओमार शेख आणि मुश्ताक अहमद यांना सोडवलं. दरम्यान, वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी नुकतीच या अपहृत विमानातील प्रवाशांशी बातचीत केली. यामध्ये काही प्रवाशांनी दावा केला आहे की अपरहणकर्त्यांपैकी एकाने त्यांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितलं होतं. शाकीरने रुपिनचा गळा चिरून प्रवाशांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितलं : पूजा कटारिया या विमानातून सुखरूप सुटका झालेली एक प्रवासी पूजा कटारिया यांनी इंडिया टूडेला मुलाखत दिली. यावेळी त्या म्हणाल्या, "अपहरणकर्त्यांपैकी शाकीर हा सर्वात क्रूर होता. त्याने विमानातील प्रवाशी रुपिन कट्याल यांचा गळा चिरून त्यांची हत्या केली होती. तसेच त्याने अपहृत प्रवाशांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितलं. तो म्हणाला, इस्लाम हा हिंदू धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याची इच्छा होती की सर्व प्रवाशांनी इस्लाम धर्म स्वीकारावा". हे ही वाचा >> IC 814 – The Kandahar Hijack : कंदहार विमानाच्या अपहरणकर्त्यांची खरी नावं काय होती? भोला, शंकर नावांशी काय संबंध? पूजा कटारिया म्हणाल्या, "शाकिरने त्याचं नाव डॉक्टर असं सांगितलं होतं. सर्वजण त्याला डॉक्टर म्हणूनच हाक मारायचे. तो शिकलेला वाटत होता. त्याने विमानात तीन ते चार वेळा भाषणं केली. आम्ही इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी तो भाषण करायचा. तो म्हणायचा इस्लाम धर्म सर्वात श्रेष्ठ आहे. तो हिंदू धर्मापेक्षा चांगला आहे. त्याने विमानात रुपिन कट्याल या प्रवाशाची गळा चिरून हत्या केली होती. रुपिन आणि त्याची पत्नी रचना कट्याल हे दोघे नेपाळला हनीमूनसाठी गेले होते. हनीमूनवरून परतणाऱ्या रुपिन यांची त्याने हत्या केली. हे पाहून रचनाला खूप मोठा धक्का बसला होता".