IC 814 ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. भारताचं विमान दहशतवाद्यांनी अपहरण करुन कंदहार या ठिकाणी नेलं होतं. या घटनेवर ही वेब सीरिज बेतली आहे. अनुभव सिन्हा यांनी या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. या वेब सीरिजमुळे वाद निर्माण झाला आहे. कारण यात अतिरेक्यांची नावं 'भोला' आणि 'शंकर' अशी दाखवण्यात आली आहेत. आता याबाबत त्या विमानात प्रवास करणाऱ्या आणि ज्यांना ओलीस ठेवलं गेलं होतं त्यापैकी एका महिलेने या सगळ्यावर भाष्य केलं आहे. IC-814 वरुन काय वाद? IC-814 कंदहार हायजॅक या वेबसीरिजवरुन वाद निर्माण झाला आहे. दहशतवादी नरमाईचं धोरण स्वीकारत होते, त्यांची नाव हिंदू दाखवली यावरुन वाद निर्माण झाला. आता त्यावेळी असलेल्या वाजपेयी सरकार दहशतवाद्यांचं हे प्रकरण हाताळण्यात कमी पडलं असं काँग्रेस म्हणतं आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या या वेब सीरिजमुळे अनेक वाद सुरु झाले आहेत. दरम्यान ही घटना घडत असताना ज्या प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आलं होतं त्यातल्या दोन प्रवाशांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. राकेश कटारिया काय म्हणाले? राकेश कटारिया आणि पूजा कटारिया या दोघांचं नवीनच लग्न झालं होतं. ते दोघंही मधुचंद्राहून परतत होते. त्यावेळी ही विमान अपहरणाची घटना घडली. याच घटनेवर आता जी वेबसीरिज आली आहे त्याबाबत विचारलं असता राकेश कटारिया म्हणाले ही वेब सीरिज मी बघणार नाही. तो अनुभव मला वेबसीरिजच्या अनुभवातूनही पुन्हा जायचं नाही असं त्यांनी सांगितलं. तर पूजा कटारिया यांनी त्या अनुभवांबाबत इंडिया टुडेला मुलाखत दिली. पूजा कटारिया काय म्हणाल्या? "नेटफ्लिक्सवर जे वेबसीरिजमध्ये दाखवलं आहे ते खरं आहे. एवढंच नाही भोला आणि शंकर ही नावंही अतिरेक्यांची होतीच. फक्त हीच नावं नाही तर बर्गर, डॉक्टर आणि चीफ ही त्या अतिरेक्यांची नावं होती ती नावं योग्यच दाखवली आहेत. या सगळ्या नावांनी ते एकमेकांना हाक मारत होते. ही त्यांची सांकेतिक नावं (कोड नेम्स) होती." असं पूजा कटारिया यांनी इंडिया टुडेला सांगितलं. डॉक्टरने धर्मपरिवर्तन करायला सांगितलं होतं पूजा कटारिया म्हणाले, "या अतिरेक्यांमधला चीफ आणि डॉक्टर हे दोघंही शिकलेले होते. डॉक्टर सगळ्यांना इस्लाम स्वीकारा, तुमचं सरकार तुमच्यासाठी काही करत नाही असं सांगत होता. त्याचं बोलणं अनेकांना पटलं. बर्गर नावाचा दहशतवादी खेळीमेळीने राहात होता, अंताक्षरी खेळत होता. चीफने एक दिवस आम्हाला सांगितलं आता तुम्ही कुणी वाचणार नाही. मात्र नंतर पुढच्या घडामोडी घडल्या आणि आम्ही सुटलो. ३० डिसेंबर १९९९ हा तो दिवस होता. त्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की तुमचं सरकार काहीही करत नाही आम्ही आता तुम्हाला एक एक करुन ठार करणार." अशी आठवण पूजा कटारियांनी सांगितली. पूजा कटारिया म्हणाल्या, बर्गरने मला एक शाल भेट दिली. ज्यावर त्याचं नाव लिहिलेलं होतं. माझ्या प्रिय बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला माझ्याकडून भेट असंही त्याने यावर लिहिलं होतं. अशी आठवणीही पूजा कटारियांनी इंडिया टुडेला सांगितली.