चेंडू स्टम्पवर आदळल्यानंतरही काही वेळेला न पडणाऱ्या वादग्रस्त ‘एलईडी’ बेल्स बदलण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नकार दर्शवला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली तसेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने या बेल्सविषयी रविवारी तक्रार केली होती.  ‘‘स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारचे बदल केले जाणार नाहीत, जेणेकरून स्पर्धेच्या एकात्मतेला धक्का पोहोचेल. १० संघांमध्ये होणाऱ्या सर्व ४८ सामन्यांसाठी सारखीच साधनसामुग्री वापरली जाईल. गेल्या चार वर्षांपासून ‘एलईडी’ स्टम्पमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. जवळपास एक हजारपेक्षा जास्त सामन्यांमध्ये हेच तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. काही वेळेला समस्या होऊ शकते, पण सर्वानी त्याचा स्वीकार करायला हवा,’’ असे ‘आयसीसी’च्या पत्रकात म्हटले आहे.