करोनाचा नवा विषाणू ‘ओमिक्रॉन’मुळे सध्या संपूर्ण जगात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘ओमिक्रॉन’चा उद्रेक झाल्याने काही देशांनी निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या देशांमध्ये करोनाचा नवा विषाणू सापडला आहे त्यांच्यावर काही देशांनी प्रवासासाठी निर्बंध लावले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशात सतर्कतेचे आदेश दिले. तसंच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याच्या निर्णयाबद्दल फेरविचाराचे निर्देशही त्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले. यादरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधक संस्थेने (ICMR)‘ओमिक्रॉन’बद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

आयसीएमआरने सध्या घाबरण्याची कोणतीही गरज नसून काळजी घेण्यासोबतच लवकरात लवकर करोनाचा दुसरा डोस घ्यावा असं आवाहन केलं आहे. “‘ओमिक्रॉन’मध्ये होत असलेले रचनात्मक बदल काळजी वाढवण्याची शक्यता कमी आहे. हा नवा विषाणू घातक किंवा अनेक आजार निर्माण करणारा ठरेल असं गरजेचं नाही. अशी कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नसून आपल्याला वाट पहावी लागेल,” असं आयसीएमआरचे डॉक्टर समीरन पांडा यांनी सांगितलं आहे.

देशभर सतर्कता! ; ‘ओमिक्रॉन’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी पंतप्रधानांचे निर्देश

समीरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या नव्या विषाणूंमधील उत्परिवर्तने सूचक असलं तरी ते वेगाने फैलाव करेल असं लगेच म्हणता येणार नाही. मात्र सतर्क राहणं आणि पूर्वकाळजी घेणं महत्त्वाचं असल्याचंही ते म्हणाले आहेत.

“घाबरण्याची कोणतीही गरज नाही. आपल्याला तात्काळ लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. दोन्ही लसीचे डोस घेतलेल्यांची संख्या वाढली तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हे उत्तम असेल,” असं ते म्हणाले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणालेत की, “करोनाचा नवा व्हेरियंट गंभीर असला तरी लागण होण्याची पद्धत सारखीच आहे, त्यामुळे लसीकरणासोबत मास्कचा वापर, गर्दी टाळणं, सॅनिटायजेशनचा वापर अशा गोष्टी त्याच्याविरोधात लढण्यासाठी महत्वाच्या आहेत”.

पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा

देशातील करोना परिस्थिती आणि लसीकरणाची सद्य:स्थिती याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या वेळी ‘ओमिक्रॉन’चा उद्रेक आणि जागतिक आरोग्य संघटनेने त्याच्या फैलावाबद्दल दिलेल्या इशाऱ्याची माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली. पंतप्रधानांनी नव्या विषाणूच्या उद्रेकाबद्दल चिंता व्यक्त केली आणि रुग्ण आढळलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले, असे पंतप्रधान कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत, नव्या विषाणूमुळे भारतावर होणाऱ्या परिणामांचीही चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी ‘ओमिक्रॉन’च्या धोक्याबद्दल लोकांना अधिक सावध राहण्याचे, मुखपट्टी वापरण्याचे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले, असे पंतप्रधान कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

जनुकीय क्रमनिर्धारण

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे नमुने घेऊन त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या करण्याचे निर्देशही पंतप्रधान मोदी यांनी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पंतप्रधानांचे निर्देश

– आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा.

– परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करा, त्यांच्या चाचण्या करा.

– ओमिक्रॉनचे रुग्ण आढळलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांबाबत अधिक सतर्क राहा.

जगभरात काय?

ओमिक्रॉन’च्या भयामुळे अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकी देशांतील प्रवासावर निर्बंध आणले आहेत. या नव्या विषाणूचा फैलाव वेगाने होत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिल्यानंतर युरोपीय महासंघातील देश, ब्रिटनसह ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, इराण, जपान, थायलंड आणि अमेरिकेनेही दक्षिण आफ्रिकी देशांतून होणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंधने घातली आहेत. बेल्जियम, इस्रायल, जर्मनी, हाँगकाँग आणि ब्रिटनमध्येही ‘ओमिक्रॉन’चे रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून जर्मनीत दाखल झालेल्या दोन विमानांतील ६१ प्रवासी बाधित आढळले आहेत.