लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशात पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होत असल्याचे ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) ताज्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. बदलती जीवनशैली, तंबाखू व सुपारीचे वाढते सेवन आणि उशिरा होणारे निदान ही या वाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.

‘आयसीएमआर’च्या अभ्यासानुसार, पुरुषांमध्ये तोंडाचा कर्करोग हा देशातील सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक ठरत असून काही भागांमध्ये त्याचे प्रमाण इतर कर्करोगांपेक्षाही जास्त असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागांसह शहरी भागांमध्येही या आजाराचा वेगाने प्रसार होत आहे.

अहवालातील आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे हा कर्करोग आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. ३० ते ५० वयोगटातील तरुणांमध्येही त्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कामाचा ताण, अनियमित जीवनशैली आणि व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी अधिक जोखमीच्या गटात येत असल्याचे दिसून येते. उशिरा होणाऱ्या निदानामुळे तोंडाच्या कर्करोगाची वाढ होते. अनेक रुग्ण सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित करतात किंवा वेळेवर वैद्यकीय सल्ला घेत नाहीत. त्यामुळे बहुतांश प्रकरणे प्रगत टप्प्यात आढळतात. याचे उपचार अधिक कठीण आणि खर्चिक होतात. परिणामी, मृत्यूदर वाढण्याची शक्यता अधिक असते.

खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाय

– डॉक्टरांच्या मते तोंडात दीर्घकाळ न भरणारी जखम, पांढरे किंवा लाल डाग, गिळताना त्रास होणे किंवा मानेत गाठ जाणवणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

– तंबाखू आणि सुपारीचे सेवन पूर्णपणे टाळणे, नियमित तोंडी तपासणी करणे, जनजागृती वाढवणे आणि प्राथमिक स्तरावर स्क्रीनिंग कार्यक्रम राबवणे अत्यावश्यक

तंबाखू हेच सर्वात मोठे कारण

तज्ज्ञांच्या मते, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे या कर्करोगामागील सर्वात मोठे कारण आहे. गुटखा, पानमसाला, सुपारी आणि धूम्रपान या सवयी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यासोबतच मद्यपान, अयोग्य आहारपद्धती आणि तोंडी स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष यामुळे धोका आणखी वाढतो. काही प्रकरणांमध्ये ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ (एचपीव्ही) संसर्गाचाही संबंध आढळून येत आहे.