Israel Defense Forces (IDF) officially announced the killing of senior Iranian Intelligence Ministry leaders : इस्रायल आणि अमेरिेकने संयुक्तपणे इराणवर हल्ले सुरू ठेवले असून इराणकडूनही प्रत्युत्तर येत आहे. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी हल्ल्यात मारले गेल्यानंतर आता इस्रायलने पुन्हा एकदा इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. इस्रायलने थेट गुप्तचर मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांवरच हल्ले केले. या हल्ल्यात अनेक वरिष्ठ अधिकारी मारले गेल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलच्या लष्करी दलाने यासंदर्भात एक्स पोस्ट केली आहे.

इस्रायल लष्करी दल (IDF) ने एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, या हल्ल्यात सय्यद याह्या हमीदी मारले गेले असून ते इस्रायल व्यवहार विभागाचे उपगुप्तचर मंत्री होते. यांनी इराण आणि परदेशात ज्यू, पाश्चात्य घटक आणि शासन विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी कारवायांचे नेतृत्व केले होते. तसंच, हेरगिरी विभागाचे प्रमुख जलाल पूर हुसेन हेही या हल्ल्यात ठार झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आयडीएफ (IDF) च्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’ च्या सुरुवातीच्या हल्ल्यात त्यांना लक्ष्य करण्यात आले आणि त्यांचा खात्मा करण्यात आला. इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यात खात्मा झाला आहे. तसंच, इस्रायली हवाई दलाने (IAF) तेहरानमधील मंत्रालयाच्या मुख्यालयावरही हल्ला केला असल्याचं इस्रालयलच्या लष्करी दलाने सांगितलं आहे.

अयातुल्ला खामेनी ठार

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (वय ८६) यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्याबरोबरच इराणच्या संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अब्दुलरहिम मौसावी, संरक्षणमंत्री अझीझ नसीर झादेह, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख आणि सुरक्षा सल्लागार अली शामखानी हेदेखील हवाई हल्ल्यात ठार झाल्याची माहिती इराणच्या सरकारी दूरचित्रवाहिन्यांनी दिली. खामेनी यांच्या मृत्यूनंतर अयातुल्ला अली रझा अराफी यांची इराणच्या नेतृत्व मंडळात न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खामेनी यांच्यानंतर नवे नेतृत्व नियुक्त होईपर्यंत ते हंगामी कारभार सांभाळतील.