कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डीके शिवकुमार आता मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या तयारीत आहेत. आपल्यालाही मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी काही ज्येष्ठ आमदार राजीनामा अस्त्र उगारून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजीनामा देण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांना मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी एका वाक्यात सूचक इशारा दिला आहे. जर कुणी राजीनामा देण्याचा प्रयत्न केला तर तो मी क्षणात स्वीकारेल, असे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केले आहे.

डीके शिवकुमार म्हणाले, “राजीनामा देणे हा राजकारणाचा भाग आहे. ज्याला राजीनामा द्यायचा आहे. त्यांना कुणी थांबवू शकत नाही. त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर तो मी एका मिनिटात मंजूर करेन. जर त्यांना पक्ष आणि राजकारणात भविष्य घडवायचे असेल तर ते थांबतील.”

‘मीही संयम बाळगला होता’

डीके शिवकुमार यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाचा दाखला देत आमदारांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “धर्म सिंह यांच्या काळात किंवा सिद्धरामय्या यांच्या काळात, तत्कालीन सर्व मंत्री मला बाजूला सारत होत. तेव्हा मी राजीनामा देऊ शकलो असतो. मी जी. परमेश्वर यांच्याबरोबरही काम करताना संयम बाळगला नाही का?”

यानंतर डीके शिवकुमार यांनी उच्च पदावर पोहोचलेल्या काँग्रेसच्या माजी नेत्यांचे उदाहरण दिले, ज्यांना सुरुवातीच्या काळात अपयशाचा सामना करावा लागला होता. राजकीय कारकिर्दीसाठी संयम आवश्यक असतो, असे ते म्हणाले.

डीके शिवकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी कर्नाटक मंत्रिमंडळात २० आमदारांना मंत्री पद दिले गेले. मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर त्यांची ही टिप्पणी आली. विस्तारानंतर मंत्रीपदे न मिळाल्याने काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी लगेचच निराशा व्यक्त केली. राज्य मंडळे आणि महामंडळांमधील नियुक्त्यांची पुनर्रचना पूर्ण झाल्यावर आपण नाराज आमदारांशी वैयक्तिकरित्या बोलू, असे डी. के. शिवकुमार म्हणाले आहेत.

“आम्ही मंडळ आणि महापालिकांच्या नियुक्त्यांमध्ये फेरबदल करत आहोत. आम्ही आधीच सांगितले होते की, या नियुक्त्या आणि अगदी मंत्रीही अडीच वर्षांनंतर बदलले जातील. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी आमदारांना बोलावून प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या बोलेन,” असेही डीके शिवकुमार म्हणाले.

त्यांनी नवनियुक्त मंत्र्यांना त्यांच्या नियुक्तीचा उत्सव साजरा करण्याऐवजी तात्काळ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा सुरू करण्याचे निर्देशही दिले.
“मी सर्व मंत्र्यांना सूचना दिली आहे की, त्यांनी उद्यापासूनच सर्व दुष्काळग्रस्त भागांना भेटी देण्यास सुरुवात करावी. वेळ वाया घालवू नका. सर्व जिल्ह्यांना भेटी द्या आणि दुष्काळ निवारण्याच्या कामात सहभागी व्हा,” असे आवाहन त्यांनी केले.