Mojtaba Khamenei Health status and Iran Supreme Leader Successor: इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर इराणच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पश्चिम आशियातील संघर्षाच्या सुरुवातीला अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यात त्यांचे वडील अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर मोजतबा यांनी देशाची धुरा सांभाळली होती. मात्र आता त्यांच्याही आरोग्याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. जर ते सर्वोच्च नेत्याचे पद सांभाळण्यास असमर्थ ठरले किंवा त्यांचा मृत्यू झाला तर इराणचे नेतृत्व कोणाकडे जाणार? या प्रश्नाने इराण आणि जागतिक राजकारणाचे लक्ष वेधून घेतले आहे.
इस्रायलची वृत्तवाहिनी चॅनेल १४ ने दिलेल्या माहितीनुसार, मोजतबा खामेनी यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. तर इतर काही आंतरराष्ट्रीय अहवालांमध्ये त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तथापि इराणच्या अधिकृत यंत्रणांनी किंवा कोणत्याही स्वतंत्र स्रोताने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. सर्वोच्च नेतेपद स्वीकारल्यापासून मोजतबा हे सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष समोर आलेले नाहीत. यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतच्या संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इराणच्या संविधानात कोणती तरतूद?
इराणच्या संविधानानुसार सर्वोच्च नेत्याचे पद रिकामे झाल्यास नव्या नेत्याची निवड होईपर्यंत विशेष व्यवस्था केली जाते. संविधानातील कलम १११ नुसार सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाल्यास किंवा त्यांनी राजीनामा दिल्यास किंवा ते कारभार पाहण्यास असमर्थ ठरल्यास तीन सदस्यांची तात्पुरती परिषद देशाचा कारभार हाती घेते.
या परिषदेमध्ये इराणचे विद्यमान अध्यक्ष मसूद पेझेश्कियान, न्यायपालिकेचे प्रमुख गुलाम हुसेन मोहसेनी आणि गार्डियन कौन्सिलचे एक धार्मिक कायदेतज्ज्ञ यांचा समावेश होऊ शकतो.

नवी निवड कोण करणार?
इराणच्या सर्वोच्च नेत्याची औपचारिक निवड करण्याची घटनात्मक जबाबदारी ८८ सदस्यांच्या असेंबली ऑफ एक्सपर्ट्स या संस्थेकडे असते. सर्वोच्च नेत्याकडे इराणचे सैन्य, न्यायव्यवस्था, परराष्ट्र धोरण आणि इतर सर्व प्रमुख सरकारी संस्थांचे सर्वाधिकार असतात. त्यामुळे हे पद रिकामे झाल्यास लवकरात लवकर नवीन नेत्याची निवड करणे या असेंबलीसाठी बंधनकारक असते.
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत मोजतबा खामेनी यांच्या अनुपस्थितीमुळे इराणच्या राजकीय भविष्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत.
