आपण आहात तर देश आहे. आपण देशातील लोकांचा आनंद आहात. मी आज आपल्याकडे सर्व भारतीयांच्या शुभेच्छा आणि प्रेम घेऊन आलो आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद आपल्यासाठी घेऊन आलोय, अशा शब्दांत पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएफच्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दिवाळी साजरी करण्यासाठी मोदी सध्या राजस्थानातील जैसलमेर सीमेवर आहेत. या ठिकाणी त्यांनी जवानांना संबोधित केले.

मोदी म्हणाले, “दिवाळीनिमित्त सर्व सैन्य दलांना माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा. आपण आहात तर देश आहे, देशातील लोकांचा आनंद आहे. मी आज आपल्याकडे सर्व भारतांच्या शुभेच्छा आणि प्रेम घेऊन आलो आहे. प्रत्येक ज्य़ेष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद मी आपल्यासाठी घेऊन आलोय. तुमच्यासाठी मी मिठाईपण घेऊन आलोय. या मिठाईमध्ये सर्व देशवासीयांचं प्रेम आणि आपलेपणाचं स्वाद आहे. या मिठाईत देशाच्या प्रत्येक आईच्या हाताची गोडी अनभवू शकता.”

“आपण भलेही बर्फाळ डोंगरांमध्ये असाल किंवा वाळवंटात असाल माझी दिवाळी तर तुमच्यामध्ये आल्यानंतरच पूर्ण होते. आपल्या चेहऱ्यावरील तेज पाहतो आनंद पाहतो तर मलाही दुप्पट आनंद होतो. हिमालयाची उंची असो, वाळवंटाचा विस्तार, घनदाट जंगलं किंवा समुद्राची खोली असो प्रत्येक आव्हानावर आपलं शौर्य भारी पडलं आहे,” अशा शब्दांत मोदींनी जवानांचा गौरव केला.