scorecardresearch

“तुम्हाला काश्मिरी पंडितांबद्दल काळजी वाटत असेल तर…”; संसदेत सुप्रिया सुळेंनी केली मागणी

लोकसभेत जम्मू आणि काश्मीरच्या अर्थसंकल्पावर चर्चा करताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जम्मू-काश्मीरच्या बजेटवरून मोदी सरकारवर टीका केली. सरकारने अर्थसंकल्पात विस्थापित काश्मिरींसाठी काहीही केले नाही, असा आरोप सुळे यांनी केला. गेल्या ६० वर्षांत जे घडलं ते घडलं, पण पुढची किती वर्षे तुम्ही तेच बोलणार आहात. तेच ते ऐकून आता कंटाळा आलाय, असं सुप्रिया सुळे आज संसदेत बोलताना म्हणाल्या. लोकसभेत जम्मू आणि काश्मीरच्या अर्थसंकल्पावर चर्चा करताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

सुप्रिया सुळे लोकसभेत बोलताना केंद्र सरकारला म्हणाल्या की, “तुम्हाला काश्मिरी पंडितांबद्दल वाईट वाटत असेल, तर त्यांचा अर्थसंकल्पात समावेश करा, त्यांच्यासाठी वेगळ्या तरतुदी करा. नेहमीच गेल्या ६० वर्षांत त्यांच्यावर किती अन्याय झाला हे सांगणं गरजेचं नाही. तुम्हाला देखील सत्तेत येऊन सात वर्षे झाली आहेत. झालं ते सोडून देत तुम्ही का त्यांना मदत करत नाही. एखादं मूल जर कुपोषित असेल तर त्याची आई त्याला सात वर्षात चांगलं खायला देईल आणि त्यांला निरोगी करेल, कुपोषणातून बाहेर काढेल, माझं मूल कुपोषित आहे, असं सांगत फिरणार नाही,” असं उदाहरण देत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला सुनावलं. तसेच सरकारनं भूतकाळात न जगता वर्तमान काळात जगावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

Video: “आई-बाप काढायचे नाहीत”; सुप्रिया सुळेंनी संसदेतच मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्याला सुनावलं

केंद्र सरकारने काश्मिरी लोकांना हजारो नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, मात्र त्याबद्दल काहीही झाले नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच काश्मिरी पंडितांसाठी ते काय करणार आहेत हे सरकारने सांगावे आणि त्यांच्या भविष्यावर चर्चा करावी, भाजपाच्या सदस्यांनी केंद्रशासित प्रदेशात जाऊन वास्तविकता जाणून घ्यावी, असेही त्या म्हणाल्या. जम्मू आणि काश्मीरमधील जीडीपी आणि कर्जाचं प्रमाण चिंताजनक असून स्मार्ट सिटी हा अयशस्वी प्रकल्प असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.  

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: If you feel for kashmiri pandits then include them in budget says supriya sule hrc

ताज्या बातम्या