सुपर इफेक्ट्सचा जादूगार क्रिस कॉर्बोल्ड यांनी बाँडपट आणि बॅटमॅनच्या गमतीजमती उलगडल्या
पणजी : व्हिज्युअल इफेक्ट्स, सुपर इफेक्ट्स आणि भविष्यातील सिनेमाची नवी परिभाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एआय सिनेमाविषयीच्या चर्चा आणि या क्षेत्रांचे वास्तव संबंधित तज्ज्ञांकडून ऐकण्याची संधी ५६ व्या इफ्फी महोत्सवाने चित्रपट रसिकांना उपलब्ध करून दिली.
एकीकडे डिजिटल आणि एआय यांसारख्या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक पद्धतीने चित्रपटनिर्मिती संपून जाणार की काय? अशी भीती व्यक्त होत असताना डिजिटल तंत्रज्ञान किंवा कोणतेही तंत्रज्ञान हे साधन आहे, ती संपूर्ण प्रक्रिया नव्हे, असे जेम्स बाँडपट, प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलानच्या ‘बॅटमॅन द डार्क नाइट’ आणि ‘इन्सेप्शन’सारख्या चित्रपटांसाठी सुपर इफेक्ट्सची जबाबदारी सांभाळलेल्या क्रिस कॉर्बोल्ड यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्ष निर्मिती आणि डिजिटल तंत्रज्ञान या दोन्हींच्या समतोलातूनच उत्तम सिनेमा तयार होऊ शकतो, हे अधोरेखित करताना त्यांनी दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलानच्या हट्टापुढे नमते घेत बॅटमॅन चित्रपटातील प्रसिद्ध ट्रक उडवण्याचे दृश्य कसे चित्रित करण्यात आले याचा किस्साही सांगितला.
एआय सिनेमा म्हणजे काय?
व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) आणि स्पेशल इफेक्ट्स (एसएफएक्स) यात फरक काय आहे? त्यामागचे तंत्रज्ञान, संकल्पना माहिती आणि प्रात्यक्षिकासह उलगडून सांगण्याचा प्रयत्न इफ्फी महोत्सवात गेले तीन-चार दिवस सातत्याने विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शन सत्रातून केला जातो आहे. याच सत्रांचा एक भाग म्हणून प्रसिद्ध अशा हॉलीवूडपटांसाठी सुपर इफेक्ट्सची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या एसएफएक्स तज्ज्ञ क्रिस कॉर्बोल्ड यांच्याही मुलाखत सत्राचे आयोजन इफ्फी महोत्सवात करण्यात आले होते.
पणजी येथील कला अकादमीत रंगलेल्या या सत्रात केवळ शब्दांचा खेळ करण्यापेक्षा क्रिस कॉर्बोल्ड यांनी त्यांच्या चित्रपटांमधील काही गाजलेल्या प्रसंगांचे फुटेज दाखवत ते कसे चित्रित झाले त्यांची जन्मकहाणीही सांगितली. केवळ व्हिज्युअल इफेक्ट्स वा एआयसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने वस्तूंच्या संगणकीय प्रतिमा तयार करून दृश्य चित्रित करण्यावर दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यांचा विश्वास नाही. सेटवर प्रत्येक गोष्ट, वस्तू ही प्रत्यक्ष निर्माण केली गेला पाहिजे, हा त्यांचा हट्ट असतो.
नोलान नेहमी गाडी, इमारती वा अन्य वास्तू प्रत्यक्षात त्यांच्या प्रतिकृती बनवून मग त्यासंबंधीची दृश्ये चित्रित करण्यावर जोर देतात. ‘कसिनो रॉयल’ या बाँडपटातील एका दृश्यात सातमजली इमारत पाण्यात बुडताना दाखवली आहे. त्या दृश्यासाठीही कॉर्बोल्ड आणि त्यांच्या तंत्रज्ञांच्या चमूने या इमारतीची प्रतिकृती बनवली होती आणि मग ती इमारत कोसळण्याचे दृश्य चित्रित करण्यात आले.
अगदी ‘बॅटमॅन द डार्क नाइट’ या चित्रपटातही बॅटमॅन एक संपूर्ण लांबलचक ट्रक उलटवतो असे एक दृश्य आहे. हे दृश्य चित्रित करत असताना आपण इतका मोठा ट्रक प्रत्यक्षात उलटवू शकणार नाही, असे मी नोलानला सांगितले होते. मात्र त्याने आपला हट्ट सोडला नाही आणि खरोखरच आम्ही तो ट्रक उडवला, असा किस्साही कॉर्बोल्ड यांनी सांगितला.
एक स्पेशल इफेक्ट तज्ज्ञ म्हणून प्रत्यक्षात वस्तू बनवून त्या उडवणे किंवा बॉम्बस्फोटासारखी दृश्ये अतिशय काटेकोरपणे काळजी घेऊन घडवली जातात, असे त्यांनी सांगितले. या प्रकारची दृश्ये चित्रित करताना कलाकारांची काळजीही घ्यावी लागते. त्यांच्यासाठी अग्निसुरक्षा, अपघात होऊ नयेत म्हणून अगदी सेकंदासेकंदाच्या दृश्यांसाठी प्रचंड पूर्वतयारी केली जाते. त्यात कला दिग्दर्शक, कॅमेरामन यापासून अनेक तंत्रज्ञ आणि त्यांचे विभाग यांचा सहभाग असतो, असे कॉर्बोल्ड यांनी सांगितले.
डिजिटल तंत्रज्ञान आणि वास्तव प्रतिमा दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या…
डिजिटल तंत्रज्ञान आले तेव्हा सुरुवातीच्या काळात आता प्रत्यक्षात वस्तू वा दृश्यनिर्मितीचे आपले काम संपणार, असे भय माझ्याही मनात होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. आमच्या विभागाने डिजिटल तंत्रज्ञान शिकून घेतले. आधी वास्तवात त्या वस्तू उभ्या करा, दृश्यनिर्मिती करा आणि मग त्याला उठाव देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घ्या. दोन्हींच्या अचूक मिश्रणातून उत्तम दृश्यनिर्मिती साधली जाईल, असे कॉर्बोल्ड यांनी सांगितले.
